नाशिक : शहरात रिक्षाचालकांच्या दादागिरीचे अनेक प्रकार समोर असतानाच आता एका रिक्षाचालकाने रस्त्याने जाणाऱ्या वीसवर्षीय युवतीसमोर नग्न होत तिचा पाठलाग केला. तसेच अश्लील शब्द वापरले. मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, पोलिसांनी काही तासांतच संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पीडिता गुरुवारी (दि. १०) रात्री १० च्या सुमारास उपनगर येथून द्वारका भागात येत होती. तेव्हा बोधलेनगर - द्वारका सर्कलदरम्यान संशयित रिक्षाचालक मीजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख (२०, रा. बागवानपुरा, जुने नाशिक, भद्रकाली) याने रिक्षातून तिचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्याने पीडितेला वेळोवेळी 'तुमको किधर जाना है?' असे विचारून वाईट नजरेने बघितले. तसेच अश्लील हातवारे करीत पाठलाग केला. या प्रकारामुळे युवती प्रचंड घाबरली होती. मात्र, रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने द्वारका सर्कल येथे अंगावरील सर्वच कपडे काढून नग्न होत तिला अश्लील इशारे केले. यानंतर तिला 'तुझे छोडूंगा नही', असे म्हणत तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे घाबरलेल्या पीडितेने तिची कशीबशी सुटका करून घेत, घर गाठले. तसेच दुसऱ्या दिवशी मुंबई नाका पोलिस ठाण्यात जाऊन आपबीती कथन केली. यावेळी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित रिक्षाचालकाचा शोध घेत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडे सखाेल तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संताेष नरुटे यांनी दिली आहे.
रिक्षाचालक मीजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. मात्र, अशातही तो शहरातच वास्तव्य करीत असून, रिक्षाचा व्यवसाय करीत असल्याचेही आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची रिक्षा जप्त केली आहे.
शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी व्हिजिबल पाेलिसिंग नजरेआड केल्याने काही सराईत रिक्षाचालक, दुचाकीस्वार शहरवासीयांना वेठीस धरत आहेत. त्यांच्यावर कठाेर कारवाईची अपेक्षा सामान्यांनी व्यक्त केली आहे. विशेषत: रिक्षाचालकांची दादागिरी वाढली असून, पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पीडितेचा विनयभंग केल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने द्वारका भागात यथेच्छ धुडगूस घातला. दोघांनी रस्त्याने जाणाऱ्या सिटीलिंक बसच्या ड्रायव्हर व कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता या बसच्या काचेवर दगडफेक करून नुकसान केले. याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.