नाशिक : आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयात लाच घेऊन पैसे मोजत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच मुख्याध्यापकाने कार्यालयातून पळ काढल्याची घटना सटाणा येथील शासकीय आश्रमशाळेत घडली.
तताणी येथील आश्रमशाळेत गुरुवारी (दि. 24) हा प्रकार घडला. याप्रकरणी मुख्याध्यापक जितेंद्र खंडेराव सोनवणे (45) याच्याविरोधात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
बागलाण तालुक्यातील तताणी शासकीय आश्रमशाळेच्या दळणाचे बिल 87 हजार 480 रुपये बँक खात्यावर जमा करण्याच्या आणि बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक सोनवणेने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हा 33 वर्षीय रोजंदारी शिक्षक असून, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराकडे छोटी पिठाची गिरणी असून, त्यांना आश्रमशाळेचे धान्य दळून देण्याचे कंत्राट मिळाले आहे. तक्रारदारांचे दळणाचे बिल 87 हजार 480 रुपये झाले आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे आठ हजार रुपये व मार्च आणि एप्रिल 2025 या महिन्याचे दळणाचे बिल मंजूर करून देण्यासाठी 1300 रुपये असे एकूण 9 हजार 300 रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी सोनवणेने 8 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदाराकडून संशयित सोनवणेने लाचेची रक्कम घेतली. लाचेचे पैसे मोजत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आल्याची चाहूल लागताच सोनवणेने कार्यालयातील दुसर्या दाराने पळ काढला. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाच्या पोलिस उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेबाडे व संतोष गांगुर्डे, पोलिस नाईक युवराज खांडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.