पंचवटी (नाशिक) : दोन दिवसांपूर्वी मेरी परिसरातील ओंकारनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकावर हल्ला करीत परिसरातील वाहनाची तोडफोड करीत जबरी लूट केल्याची घटना घडली होती. यातील सहा संशयितांना ताब्यात घेण्यात म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. यात तीन विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदिप बाबुराव काकडे (४२) हे बांधकाम व्यावसायिक असून ते आपल्या कुटुंबासह किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओंकार नगर येथील साईपुष्प अपार्टमेंट वास्तव्यास आहेत. मंगळवार (दि.२७) रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास काही संशयितांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची दगड, विटा, लाकडी दांडके आणि कोयत्याच्या साहाय्याने तोडफोड केली. याचा मोठा आवाज झाल्याने काकडे व त्यांचा मुलगा हर्ष हा पार्किंगमध्ये आला. त्यावेळी संशयित सोनू धात्रक, प्रिंस सहानी, चेतन गायकवाड, प्रणव मनेरे यांच्यसह काही अनोळखी मुले वाहनांची तोडफोड करताना दिसले, त्यांना विचारणा केली असता तुझा मुलगा आमच्या विरुद्ध गँग चालवतो, असे म्हणत प्रदीप काकडे यांना मारहाण केली. बिल्डिंगमधील इतर लोकांनी संशयितांना हटकले असता, त्यांनाही शिवीगाळ करीत दमबाजी केली. तसेच काकडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन पसार झाले होते. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयितांचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे दीपक पटारे यांना यातील संशयित हे मखमलाबाद परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले, यात तीन विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.