नशेच्या गोळ्यांची विक्री  Pudhari News Network
क्राईम डायरी

Nashik Crime News | बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे नशेच्या गोळ्या खरेदी

गोळ्या मागवण्याविरोधात बनावटीकरणाचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहजासहजी ज्या गोळ्या मिळत नाहीत, त्या गोळ्या खरेदी करण्यासाठी एकाने रुग्णालय व डॉक्टरांच्या नावे बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून साखळी स्वरूपाच्या मोठ्या मेडिकल स्टोअरमधून एप्रिल महिन्यात सुमारे ५०० गोळ्या खरेदी केल्याचे उघड झाले आहे. तर मे महिन्यातही पुन्हा गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न संशयिताने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉ. मुक्तेश के. दौंड (रा. गंगापूर रोड) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात बनावटीकरणाची फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. दौंड यांच्या फिर्यादीनुसार, संशयिताने २७ एप्रिल ते ५ मे दरम्यान रुग्णालयाच्या नावे बनावट लेटरहेड तयार करून त्यावर डॉ. दौंड यांची बनावट स्वाक्षरी करत घातक व नशा आणणाऱ्या गोळ्या लिहिल्या. तसेच त्यावर डॉक्टरांची बनावट स्वाक्षरी व शिक्के मारले. त्यानंतर या संशयिताने २७ एप्रिल रोजी इंदिरानगर येथील मेडिकलच्या शाखेतून तब्बल २८० गोळ्या खरेदी केल्या. त्यानंतर २९ एप्रिलला पुन्हा २९० गोळ्या घेतल्या. या गोळ्या संशयिताने बनावट प्रिस्क्रिप्शनचा वापर करून खरेदी केल्या.

दरम्यान, ५ मे रोजीदेखील संशयिताने काठेगल्ली येथील मेडिकलमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट प्रिस्क्रिप्शन पाठवून गोळ्यांची मागणी केली. मेडिकलमधील कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्याने डॉ. दौंड यांच्याशी संपर्क साधत प्रिस्क्रिप्शन पाठवले आणि विचारणा केली की, 'या गोळ्या तुम्ही लिहून दिल्या आहेत का?' त्यावेळी हे प्रिस्क्रिप्शन बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे डॉ. दौंड यांनी नकार देतसखोल चौकशी केली. त्यावेळी त्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नाव तबस्सुम इम्रान शेख असे लिहिले होते. डॉ. दौंड यांनी रुग्णालयात तपासणी केली असता, अशा नावाचा कोणताही रुग्ण उपचारासाठी आलेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोणीतरी बनावट प्रिस्क्रिप्शन तयार करून गोळ्या मागवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ. दौंड यांनी तातडीने भद्रकाली पोलिसांकडे संशयिताविरोधात तक्रार दाखल केली. मेडिकल चालकास ज्या मोबाइल क्रमांकावरून प्रिस्क्रिप्शन आले, त्या क्रमांकाच्या आधारे भद्रकाली पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला आहे.

सहजासहजी औषधे मिळत नाहीत

संशयिताने मागवलेली औषधे घातक स्वरूपाची व नशा आणणाऱ्या औषधांमध्ये मोडणारी आहेत. त्यामुळे ही औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णांना दिली जात नाहीत. तसेच ही औषधे प्रामुख्याने मनोविकाराच्या रुग्णांसाठी वापरली जातात. त्यामुळे अशा औषधांची नोंद ठेवली जाते. मेडिकलमधील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे तिसऱ्यांदा संशयिताचा गोळ्या खरेदी करण्याचा बेत फसला. या गोळ्या नशेखोरांसाठी खरेदी केल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT