नाशिक : अवैध सावकार वैभव देवरेसह इतरांच्या जाचाला कंटाळून गंगापूर रोडवरील व्यावसायिकाने जीवनयात्रा संपवली होती. व्यावसायिकास असे करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या साेनल देवरेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे संशयित देवरे दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संशयित वैभव देवरेच्या प्रत्येक कृत्यात पत्नी सहभागी असल्याचे पुरावे पोलिस तपासात समोर आले आहेत. तिला जामीन मिळाल्यास ती फरार होऊ शकते. त्यामुळे तिला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारने न्यायालयात केला.
गंगापूर रोडवरील रहिवासी व्यावसायिक धीरज पवार यांनी संशयित वैभव यादवराव देवरेकडून 7 लाखांचे कर्ज घेतले होते. त्या मोबदल्यात 12 लाख देऊनही देवरेसह त्याची पत्नी सोनल, शालक यांनी धीरज यांना दमदाटी, मारहाण करीत जास्त पैशांची मागणी केली होती. तिघांच्या या त्रासाला कंटाळून धीरज यांनी आत्महत्या केली. तिघांविराेधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्यांना अटक केली. तिघेही न्यायालयीन कोठडीत असून, सोनलने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.