नाशिक : दुचाकीने घरी जाणार्या शनिवारी (दि.14) रात्री रोजी रात्री 11.30 च्या सुमारास हॉटेलमालकाचे अपहरण करून त्याच्याकडे दहा लाखांची खंडणी मागणार्या तिघा संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हेशाखा युनिट-2 व इंदिरानगर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
शनिवारी (दि.14) रात्री 11.30 च्या सुमारास फिर्यादी हॉटेलमालक दुचाकीने पाथर्डीगाव सर्कलजवळ घरी जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. तसेच मारहाण करून त्यांचा मोबाइल हिसकावत पासवर्ड वापरून फिर्यादीच्या नावाने एका अॅपमध्ये क्रिप्टो करन्सीचे अकाउंट तयार केले. तसेच फिर्यादीच्या बँक खात्यातील पाच लाख एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच दहा लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी तपास करत संशयितांची ओळख पटविली. त्यानंतर पथकाने ठाणे जिल्ह्यातील नौपाडा येथून संशयित साजिद हमीद शेख (32, रा. फायर ब्रिगेड ऑफिससमोर, शिंगाडा तलाव, नाशिक. मूळ रा. तीन लाकडी पूल, इगतपुरी), कुणाल अनिल जरिया (25, रा. गोळीबार चौक, इगतपुरी), प्रवीण हिरामण देवकुळे (28, रा. महात्मा गांधी नगर, गोळीबार मैदानाजवळ इगतपुरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दोन लाख 40 हजार रुपये किमतीची कार व दहा हजार रुपये किमतीचा मोबाइल व अडीच लाख रुपये होल्ड करून असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.