नाशिक : विमाधारकांचे बनावट मृत्युपत्र तयार करुन वारसांच्या नावे एलआयसीच्या पंतप्रधान जीवन विमा योजनांचे सुमारे 2 कोटी रुपये बँक कर्मचाऱ्याने लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून घरझडती घेतली असता त्याच्याकडे 1 कोटी 42 लाखांच्या मुदतठेवी (एफडी) सापडल्या आहेत. न्यायालयाने संशयितास गुरुवारपर्यंत (दि.5) पोलिस कोठडी सुनावली आहे.
दीपक मोतीलाल कोळी (40, रा. भारद्वाज रेसीडेन्सी, भुजबळ फार्मजवळ, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. पंजाब नॅशनल बँकेतील कॅनडा कॉर्नर येथील शाखेत संशयित कोळी कार्यरत होता. खातेदारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु करणे, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना विमा रकमेचा दावा मिळवून देण्याचे काम कोळी करीत होता. मात्र त्याने परस्पर विमाधारक मृत झाल्याचे सांगत बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करीत दुसऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम घेत कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. त्याच्या घरझडतीतून पोलिसांना 1 कोटी 42 लाखांच्या मुदत ठेवीच्या पावत्या सापडल्या आहेत. तसेच, 12 लाखांची कारही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी कोळी याचे बँक खाते गोठविले असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरु केली आहे. कोळी याने बनावट खातेदार कसे बनविले, तसेच बनावट वारसदारांचे आधाकार्ड, पॅनकार्ड व लाईटबिल, रेशनकार्ड व मतदार कार्ड कुठून मिळविले याबाबतही पोलिसांसह बँक प्रशासन तपास करीत आहे.