जुने नाशिक : रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी बेशिस्त चालकांविरोधात दंडात्मक कारवाई मोहीम राबवली होती. मार्च ते एप्रिल या कालावधीत एकूण १०,१४७ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कडक पावलांचे नागरिकांनीही स्वागत केले.
बेशिस्त चालकांविरोधात दंडात्मक कारवाई मोहीम थंडावताच अनेक रिक्षाचालक पुन्हा जुन्या सवयींकडे वळताना दिसत आहेत. यात फ्रंटसीटवर प्रवासी बसवणे, वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा चालवणे, गणवेश न घालणे, तसेच ग्राहकांशी बेशिस्त वर्तन करणे यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः मुंबई नाका, द्वारका, काठे गल्ली आणि भद्रकाली परिसरातील रिक्षाचालक वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शहरातील काही गुन्ह्यांमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग आढळून आल्यानंतर पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाई सुरू केली. यामध्ये विनयभंग, चोरी, हाणामारीसारख्या गुन्ह्यांत रिक्षांचा वापर झाल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे चालक तसेच कालबाह्य रिक्षा वापरणारे चालक आढळले. पोलिसांनी अशा ५१ स्क्रॅप रिक्षा जप्त केल्या. सातत्यपूर्ण कारवाईमुळे काही काळ नियमपालन दिसून आले. मात्र, पोलिसांचे पथक नसल्यावर बेकायदेशीर रिक्षा चालवण्याची प्रवृत्ती पुन्हा दिसू लागली. कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा बेशिस्तगिरी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबई नाका, द्वारका आणि भद्रकाली परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघात वाढले आहेत.
रिक्षाचालकांसाठी गणवेश घालणे बंधनकारक असतानाही अनेक रिक्षाचालक हे पालन करताना दिसत नाहीत. शिवाय, फॅन्सी नंबरप्लेटचा वापर केल्यामुळे अपघात किंवा गुन्ह्यांत वापरलेल्या रिक्षांचा क्रमांक ओळखणे कठीण होते. अनेक रिक्षाचालक अचानक रिक्षा थांबवतात, ज्यामुळे पाठीमागील वाहतूक विस्कळीत होते. काही वेळा तर भरचौकातच रिक्षा थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. द्वारका, सारडा सर्कल, भद्रकाली आणि मुंबई नाका परिसरात अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.