वणी (नाशिक) : येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीवेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मातेचा व बाळाचा मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून वणी (ता. दिंडोरी) पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी मृत महिलेचे सासरे मोहन सजन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 3 जून 2024 रोजी सकाळी पौर्णिमा ऊर्फ रूपाली धर्मेंद्र जाधव (रा. हरणटेकडी, ता. सुरगाणा) यांना वणी येथील डॉ. अमितकुमार बोथरा यांच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान पौर्णिमा व बाळाचा मृत्यू झाला. सदर हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुविधा नव्हती, तसेच प्रसूतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत. पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने माता व पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
घटना घडली तेव्हा जाधव हे वणी ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पाच-सहा दिवस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ झाली. त्यानंतर फिर्याद झीरोमध्ये दाखल करून प्रकरण सुरगाणा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले होते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठवल्याने आरोग्य विभागाकडून याबाबत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत वणी येथील सर्वोदय हॉस्पिटलचे डॉ. बोथरा यांच्याकडून प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा हवाला वणी पोलिसांना मिळाल्याने अकरा महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने जखमीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत, तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे यांच्या समितीने केंद्रात जाऊन चौकशी केली. दरम्यान, मंगळवारी (दि.20) चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले.
फकिरा भिका कासे (42, रा. जानोरी ता. दिंडोरी) हे वरखेडा गावाजवळ अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र, वैद्यकीय अधिकारी जागेवर नसून ते लखमापूरला गेल्याचे सांगण्यात आले. याबाबत डॉ. खोकले यांना भ्रमणध्वानीवरून कळविले आणि रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक गावाला गेला व सोबत चावी घेऊन गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत नागरिकांनी तालुका आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधत रुग्णाला हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली. एक तास वाट पाहूनही रुग्णवाहिका आली नाही. त्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी खोकले आरोग्य केंद्रात आले. तोपर्यंत कासे यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा बळी गेला, असा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणाची दखल घेऊन डॉ. मोरे यांनी चौकशी करण्यात आली. तसेच तत्काळ डॉ. नेहते व डॉ. लोणे यांना आरोग्य केंद्रात पाठवून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.