नाशिक : अंबड पोलिस ठाणे हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स दुकानात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या तिन्ही संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. गुंडाविरोधी पथकाने गुन्ह्यातील म्होरक्याला हरियाणात अटक केली. त्याच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत केला आहे.
गुन्हे शाखा युनिट १ ने यापूर्वीच दोघांना सिन्नर फाटा, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नरेंद्र हरिराम अहिरराव (२५, रा. किरवाडा गाव, जि. सागर, मध्य प्रदेश) येथील असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील गुंडाविरोधी पथक सागर जिल्ह्यात रवाना झाले होते. परंतु, संशयित मध्य प्रदेशातून दुसऱ्या राज्यात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दुसऱ्या राज्यात गेल्याचा संशयिताचा कुठलाही पुरावा हातात नसताना गुंडाविरोधी पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाधारे संशयित हरियाणात करनाल येथे असल्याची माहिती मिळवली. त्यानुसार पथकाने करनाल गाठले. तेथे भाडोत्री म्हणून राहणाऱ्या लोकांची माहिती शनिवारी (दि. २२) रात्री काढत संशयिताची चौकशी सुरू केली. पहाटे 4 च्या सुमारास संशयित सराईत आरोपी नरेंद्र हरिराम अहिररावला करनाल शहर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्यात चोरलेले सोने व इतर मुद्देमालाचे काय केले याबाबत अधिक तपास अंबड पोलिस करीत आहेत.
संशयित नरेंद्र अहिरराव व त्याच्या अन्य साथीदारांनी रेकी करीत श्री ज्वेलर्सवर दि. १७ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकला होता. तिघेही बुलेट दुचाकीवर आले आणि काही मिनिटांतच दुकान लुटून पसार झाले होते. त्यांनी सराफ व्यावसायिक दीपक सुधाकर घोडके व त्यांच्या पत्नीवर बंदूक रोखली होती. तिघेही संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. मात्र, चेहऱ्यावर रुमाल असल्याने, त्यांची ओळख पटविण्याचे आव्हान होते. अशात पोलिसांनी एकाला सिन्नर फाटा येथून ताब्यात घेतले, तर दुसऱ्याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक केली असून, घटनेतील मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.