नाशिक: गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आंतरराज्य मोबाईल व लॅपटॉप चोर टोळी जेरबंद करत त्यांच्याकडून ५३ मोबाईल व ६ लॅपटॉप असा एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शहरभर किमान पाच किलोमीटर पायपीट करत सकाळी उघडे दरवाजे असलेल्या घरांत घुसून चोरी करणाऱ्या या टोळीकडून अजूनही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पंचवटी, सरकारवाडा, सातपूर, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गुन्हे शाखा युनिट एक कडून तपास सुरू होता. पोलीस हवालदार नाझीमखान पठाण व अमोल कोष्टी यांना दोन संशयित चोरीचे लॅपटॉप घेवुन रेल्वेने चितुर (आंध्रप्रदेश) जाणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रेल्वेस्थानकात सापळा रचत रामु बालराज (४० रा.बोडगुटपल्ली,कोटामंडल), सत्यवेल श्रीनिवासु (३६, रा.बोडगुटपल्ली, कोटामंडल, जि.चित्तुर, आंध्रप्रदेश) आणि आनंद नित्यानंद (१९) तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी सहा ठिकाणी मोबाईल व लॅपटॉप चोरल्याचे कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे आदींनी ही संशयितांना पकडण्याची कामगिरी पार पाडली.
अशी होती मोडस ऑपेरेंडी
गंगापूर, सातपूर, पंचवटी भागात अनेक तरुण हे नोकरी व शिक्षणानिमित्त फ्लॅट भाड्याने घेऊन एकत्र राहतात. पहाटे लवकर कामावर अथवा कॉलेजला जाताना रूममधील सहकारी झोपलेले असल्याने बाहेरून कडी लावत नाही. या टोळीकडून अशा रूम हेरल्या जायच्या. ज्या घराच्या बाहेर स्त्रियांच्या चप्पल दिसतील ते घर टाळत असे. ही टोळी पहाटे साडेतीन वाजता घरातून निघत किमान तीन ते चार किलोमीटर पायी प्रवास करून अगदी सकाळच्या वेळेमध्ये उघड्या असलेल्या रूममध्ये चोरी करायचे. तपास सुरू असताना काही छायाचित्र मिळाली. त्यामधून या आरोपींचा शोध लागला.