नाशिक : भेटण्याच्या बहाण्याने प्रियकराने विवाहित प्रेयसीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिंदे टाेल नाक्याजवळ घडली. शिवाय, त्यांचे आक्षेपार्ह फोटो पीडितेच्या पतीला पाठविणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे.
शुक्रवार (दि.4) रोजी सकाळी ११ वाजता पीडिता नाशिकरोड येथे शेंगदाण्याचे बिल आणण्यासाठी आली होती. दुपारी १ वाजता तिच्या पूर्वीच्या प्रियकराने तिला नांदूर नाका येथे बोलावले. तेथे भेटल्यानंतर त्याने पीडितेला पिकअपमध्ये बसवून माडसांगवीजवळील एका लॉजवर नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 'तू नवऱ्याकडे का गेली' यावरून वाद घालत त्याने तिला मारहाण केली. शिवाय, तिचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ पीडितेच्या आणि तिच्या पतीच्या व्हॉटसॲपवर पाठविले.
या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडितेने जिवाचे बरेवाईट करून घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे भयभीत प्रियकाराने तिला पिकअपमधून तिच्या माहेरी सोडून दिले. सायंकाळच्या सुमारास पीडिता तिच्या आत्याच्या घरी असताना पती मुलीसह तेथे आला. त्याने फोनवर आलेले फोटो व व्हिडीओबाबत जाब विचारला. त्यावेळी तिने आपबिती कथन केली. पतीने धीर दिल्यानंतर पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.