नाशिक : शहरात अनधिकृतपणे होर्डिंग लावत व्यावसायिक, नागरिकांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दहशत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
गुन्हेगारांची होर्डिंग लावणाऱ्यांसह संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यानुसार, अंबड पोलिस ठाण्यात सातपूर येथील भूषण प्रकाश लोंढे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारच दिवसांपूर्वी सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर, स्टेट बँक चौक, पाथर्डी फाटा आदी परिसरांमध्ये सराईत गुन्हेगारांचे होर्डिंग लावल्याचे आढळून आले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, संशयित गुन्हेगार गण्या कावळे ऊर्फ गणेश वाघ व राकेश कोष्टी यांनी लावलेले बॅनर अंबड पोलिसांनी काढून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याप्रकारे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे होर्डिंग झळकावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार धार्मिक किंवा इतर कार्यक्रमांच्या होर्डिंगवर गुन्हेगारांचे फोटो असल्यास शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हद्दीत गस्त घालत विनापरवानगी होर्डिंग असल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी फाटा, महामार्ग, दिव्या ॲडलॅब सिनेमा, शुभम पार्क रोड आदी ठिकाणी भूषण लोंढे याच्या वाढदिवसाचे होर्डिंग आढळून आले. पोलिस रेकॉर्डवरील भूषणविरोधात गुन्हा दाखल असल्याने त्याने बॅनर लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण करून व्यावसायिक व नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.