नाशिक : लाखो रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार करणाऱ्या अमित सुकदेव भुनिया (३८) या संशयितास पोलिस पथकाने पश्चिम बंगाल येथील रविदासपूर येथे जाऊन बेड्या ठोकल्या. तो दागिने बनविणारा कारागीर असून, नक्षलवाद्यांचा रहिवास असलेल्या ठिकाणी लपून बसला होता. त्याच्या अटकेमुळे बंगालमधील नक्षलवाद्यांचे नाशिक कनेक्शन तपासले जात आहे. तो नाशिकमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. सहा ते सात नागरिकांसह काही सराफांनादेखील त्याने गंडविल्याचा संशय आहे.
संगीता सतीश माळवे (३५, रा. खांदवे निवास, मखमलाबाद नाका) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात ३ फेब्रुवारीला फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अमित भुनियाविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता. भुनिया हा फिर्यादीच्या घराजवळच राहत होता. त्यांचे सोने घेऊन तो पसार झाला होता. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना खबऱ्यांकडून संशयित हा बंगाल येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीम पठाण यांचे पथक पश्चिम बंगालला रवाना झाले. केवळ फिर्यादी महिलेने दिलेल्या वर्णनावरून त्यास पथकाने मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या. त्यास तेथील न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांचे ट्रान्झिट वॉरंट मंजूर केले.
फसवणूक झालेल्या सहा ते सात जणांनी पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यातही एका महिलेकडून सामूहिक तक्रार घेण्यात आली. १३० ग्रॅम सोने व ६० हजार रुपये रोख असा एकूण चार लाख बारा हजारांचा अपहार अमित भुनियाने केला आहे. पैसे व सोने घेऊन तो पसार झाला होता. मात्र, तो दागिने बनविणारा कारागीर असल्याने काही सराफांचे सोनेदेखील घेऊन त्याने पोबारा केल्याचा संशय आहे.
भुनिया हा तब्बल पाच वर्षांपासून मखमलाबाद नाका परिसरात वास्तव्याला होता. त्याने सराफी, तसेच सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांशी ओळख करून जुने सोने घेऊन उत्कृष्ट पद्धतीचे दागिने बनवून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी त्याने अनेकांकडून सोने ताब्यात घेतले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.