सिडको (नाशिक) : मागील भांडणांची कुरापत काढून कोयते व तलवारी नाचवत दहशत निर्माण करण्याबरोबरच वाहनाची तोडफाेड करणाऱ्या चार अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी (दि.17 जुलै) रोजी रात्री दीडच्या सुमारास या टोळक्याने आझादनगर परिसरात चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयिताच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.17) रात्री संशयित गैसोद्दीन रज्जामुल्ला शेख (रा. संजीवनगर अंबड) व त्याच्या पाच ते सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारुण खान (२२, रा. आझादनगर खाडी, अंबड) यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची कोयते व दांडक्याने तोडफोड केली.
तसेच एका छोटाहत्ती व दोन दुचाकींचेही नुकसान केले. यावेळी टोळक्याने तलवारी नाचवत नागरिकांना शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी अंबड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. तर मुख्य संशयित फरार असून, पोलिस त्याच्या शोधार्थ रवाना झाले आहेत.