नाशिक : पाववडा खाल्याचे पैसे मागितल्याच्या रागातून दोघा गुंडांनी उपनगर, नाशिक-पुणे रोडवरील मेघराज बेकरीची तलवार आणि कोयत्याने तोडफोड करीत परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. उपनगर पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या असून, तोडफोड केलेल्या परिसरातूनच त्यांची धिंड काढली आहे.
पवन मुकुंद अहिरे (२०, रा. गोदावरी अपार्टमेंट, उपनगर) व संजय गौतम गवळी (२१, रा. एकलहरा) हे दोघे दुपारी चार वाजेच्या सुमारास मेघराज बेकरी येथे आले होते. दोघांनी वडापाव घालला. मात्र, पैसे न देताच, तेथून ते निघाले. अशात बेकरी मालकांनी त्यांना पैशांसाठी हटकलेले. त्याचाच राग मनात येवून या दोघांनी कोयता व तलवारीने बेकरीची तोडफोड केली. यावेळी त्यांनी नागरिकांनाही धमकावण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच भिती निर्माण झाली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, बेकरी मालकाच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत, पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दोघांचीही त्याच परिसरातून धिंड काढत, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही काळापासून शहरात सर्रासपणे तलवारी आणि कोयत्याच्या आधारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, या गुंडांवर कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.