नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला दोन ते तीन कैद्यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत फरशीच्या तुकड्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि.6) पहाटेच्या दरम्यान घडली. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कारागृहात बंदी असलेला फिर्यादी समीर संजय सोनवणे (वय २०) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो बराक नंबर आठमधील खोलीत झोपलेला असताना पहाटे ६ च्या दरम्यान संशयित कैदी मोईन जावेद शेख, अथर्व दीपक उगले, सिद्धार्थ ऊर्फ सचिन धानेकर यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून समीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फरशीचा तुकडा डोक्यात मारून जखमी केले. सोनवणेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोळे तपास करीत आहेत.