पंचवटी ( नाशिक ) : दुचाकीचे चाक पायावरून गेल्याच्या कारणावरून नांदूर नाका परिसरात तुंबळ हाणामारीची घटना घडली असून हा वाद वाढून नंतर याच परिसरातील कृषिनगरच्या रस्त्यावर दोन गटात हाणामाऱ्यातून राहुल धोत्रे व अजय कुसाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये राहुल धोत्रे हा गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पवन निमसे व त्याचे दोन साथीदार यांनी हा हल्ला केला असून, त्यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कृषि नगर रस्त्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते, त्यातील एकाला आडगाव पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तपास करताना पोलिसांनी नांदूर नाका परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या घटनेनंतर नांदूर नाका परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. या गर्दीमुळे येथे काही काळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. नांदूर नाका परिसरात आतापर्यंत किरकोळ वादाचे प्रकार घडले होते. मात्र, जीवघेणे हल्ले अद्याप झाले नव्हते. आता जीवघेणे हल्ल्याच्या घटनेने या परिसरात गुन्हेगारी वाढू लागल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.