नाशिक : व्यवसायात तोटा होऊन कर्जबाजारी झाल्याने मालेगावमधील दाम्पत्य एमडी विक्रीच्या व्यवसायात शिरल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
पैसे कमविण्यासाठी दाम्पत्यांना लासलगावमधून एमडी मिळत असे व त्यानंतर एक ते दीड ग्रॅम वजनाची एमडी पाकिटे तयार करून त्यांनी विंचूर, बागलाण, लासलगाव, कळवण व मालेगावमध्ये एमडी विकण्यास सुरुवात केली होती.
शहर अमली पदार्थविराेधी पथकाने शुक्रवारी (दि. १) सकाळी नाशिक रोड रेल्वेस्टेशन येथे सापळा रचून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या मालेगावातील कमालपुरातील अब्दुल समद सिराज अहमद अन्सारी ऊर्फ बाबू (४५) व त्याची पत्नी शबाना यांना पकडले. दोघांकडे तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा ७१ ग्रॅम एमडी साठा आढळून आला. सखोल चौकशीत मुंबईतील मीरा रोड येथून अन्सारी दाम्पत्याने ओळखीच्या माध्यमातून मेफेड्रोन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईहून नाशिक रोडपर्यंत रेल्वे प्रवास करून त्यानंतर खासगी वाहन किंवा बसने मालेगाव येथे एमडी नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, प्रवासातच दोघांना एमडी साठ्यासह पकडले. दोघांनी वर्षभरापासून ड्रग्जच्या व्यवसायात शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. मालेगावमध्ये त्यांनी दीड ते दोन हजार रुपये प्रतिग्रॅमने एमडीची विक्री केली. तर मालेगावनजीकच्या तालुक्यांमध्ये कोणामार्फत व कशी एमडी विक्री केली याचा तपास पोलिस करीत आहेत. संशयित अन्सारी यास ड्रग्जसाखळी कशी चालवायचा याचे धडे देणारा विंचूर भागातील असल्याचे निष्पन्न हाेत आहे. पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला असून, पथके मागावर आहेत. संशयित अन्सारी दाम्पत्यास आठ अपत्ये असून, कपडे विक्रीच्या व्यवसायात कर्जबाजारीपणा आल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात पाऊल टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
नाशिक शहराला एमडी ड्रग्ज तस्करांचा विळखा अधोरेखित झाला आहे. मात्र, या कारवाईमुळे नाशिक लगतच्या ग्रामीण भागातही ड्रग्ज पेडलर सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात उच्चशिक्षितांसह काही तरुणी व महिलांचाही सहभाग उघड झाला आहे.