Crime News |  Pudhari File Photo
क्राईम डायरी

Nashik Crime Diary | लाचखोर अभियंता जाळ्यात तर सराईत गुन्हेगार गजाआड.. वाचा एका Click वर

लाच घेताना उपअभियंता, कनिष्ट अभियंता जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केलेल्या कामाचे बक्षीस स्वरुपात तसेच सध्याच्या प्रलंबित कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ट अभियंत्यास दोन लाख १६ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून, त्यांनी सावरपाडा (ता. दिंडोरी) येथे जलजीवन मिशन पाणीपुवरठा योजनेअंतर्गत शिवारपाडा येथे यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरुपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेल्या कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश नारायण घारे (४४, रा. तिरुमाला भूमिका, काठे गल्ली, द्वारका) व दिंडोरी पंचायत समितीचे पाणीपुवरठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव (२९, रा. कुंजविहार सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यांनी तक्रारदाराकडे दोन लाख १६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम शुक्रवारी (दि. ८) दिंडोरी पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात स्विकारताना योगेश घारे व मनीष जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोघांविरुद्ध दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : दोन संशयित आरोपींसह गुन्हेशाखा युनिट एकचे पथक.

देशी कट्टा वापरणारे दोघे सराईत गजाआड

नाशिक : बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तुल आणि जीवंत काडतूस बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हेशाखा युनिट-1 ने अटक केली.

गुरुवारी (दि. 7) हवालदार प्रशांत मरकड व मिलिंदसिंग परदेशी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने प्रमोद महाजन गार्डनच्या पाठीमागील गेटजवळ चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. संशयास्पद हालचाल करणारे दोन जण ताब्यात घेतले असता त्यांनी आपले नाव श्रीनिवास सुरेंद्र कानडे (33, रा. दिव्यदर्शन सोसायटी, काॅलेज रोड, विसेमळा) व मोहित राम तेजवाणी (24, रा. गोदावरी कॉम्प्लेक्स, चिंचबन, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी) असे सांगितले. अंगझडतीत 31 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जीवंत काडतुसे सापडली. तपासात दोघांवर पंचवटी, सरकारवाडा, शिरपूर तालुका पोलीस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. हवालदार प्रशांत मरकड यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nashik Latest News

नाशिक : चाळीसगावातून फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना पकडणारे गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक.

चाळीसगावातील दोन फरार संशयितांना बेड्या

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दोन फरार संशयित आराेपींना गुन्हे शाखा युनिट दोनने नाशिकरोड परिसरात अटक केली. चाळीसगाव शहरात तीक्ष्ण हत्याराने व फायटरने गंभीर दुखापत करत दोघांना जिवे ठार मारण्याचा गुन्हा या दोन्ही संशयितांवर दाखल होता.

गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेताना हवालदार नितीन फुलमाळी यांना दोघेही जेल रोड, नाशिकरोड परिसरातील शिवाजीनगर भागात असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू शेळके, विलास गांगुर्डे, अंमलदार वाल्मीक चव्हाण, नितीन फुलमाळी, प्रवीण वानखेडे, संजय पोटींचे आदींचे पथक रवाना झाले. पथकाने जेल रोड, शिवाजीनगर भागात सापळा रचत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सागर तुकाराम जेडगुले (२७, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर, नाशिकरोड) व प्रशांत उर्फ पश्या शंकर लोंढे (२३, रा. सुंदरनगर, देवळाली गाव, नाशिकरोड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा बुधवारी (दि. ६) रात्री 9 च्या सुमारास चाळीसगाव शहरात कॅप्टन काॅर्नर, स्वराज हॉस्पिटलसमोर दुचाकीचा हॉर्न वाजविण्याच्या कारणावरून फिर्यादी व त्याच्या वडिलांशी वाद झाला होता. यातून त्यांनी फिर्यादी व त्याच्या वडिलांना तीक्ष्ण हत्यार व फायटरने मारहाण करून जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याची कबुली दिली. दरम्यान, दोन्ही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तिघांची 96 लाखांची फसवणूक

नाशिक : गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून तिघांची अज्ञात सायबर भामट्यांनी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. दि. ८ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान सायबर भामट्यांनी फिर्यादी व आणखी दोघांना विविध नंबरवरून फोन करून पोलिस असल्याची बतावणी केली. 'तुमचा फोन नंबर वापरला गेला असून, तुमचे अकाउंट ओपन झाले आहे. त्यातून तुम्ही अनधिकृत व्यवहार केले आहेत.' अशी भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करणार असल्याचे सांगितले. पैशांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने त्यांनी फिर्यादी व इतर दोघांचे बँक डिटेल्स मिळविले. तिघांनी घाबरून जात सायबर भामट्यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या बँक खात्यात ५० लाख, ३६ हजार, ९१ हजार २३४ रुपये व नऊ लाख ३८ हजार १० रुपये असे भरले. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT