नाशिक : बांधकाम व्यावसायिकांनी संगनमत करून फ्लॅट विक्री करताना माहिती पत्रकात दाखविलेल्या सोयी-सुविधा न पुरविता तसेच कॉरपरस फंड घेऊनही सोसायटी न दाखल केल्याने त्यांच्यावर भद्रकाली पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजित धनंजय वानखेडे (४०, रा. द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित विनोद मदनलाल तलवार, सुनील देवीसहाय गुप्ता, चंद्रा विनोद तलवार व कविता सुनील गुप्ता (सर्व रा. मुंबई) यांनी फसवणूक केली. १३ मे २०१३ ते २० जून २०२४ या कालावधीत संशयितांनी २ कोटी २६ लाख ४० हजार ४०० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. संशयितांनी मेसर्स कर्मा रियालिटी तर्फे तपोवन रोडवर कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंट बांधली. मात्र, माहितीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फ्लॅटधारकांना सोयी-सुविधा पुरवल्या नाहीत. तसेच १६३ फ्लॅटधारकांकडून कॉरपरस फंड घेतला, मात्र ती रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फ्लॅटधारकांची फसवणूक केली. या प्रकरणाचा भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.