नाशिक : पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डामागील अपार्टमेंटच्या एका घराचा दरवाजा तोडत घरात प्रवेश करून तब्बल पाच लाख 63 हजार 750 रुपयांची जबरी घरफोडी झाली आहे.
या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश मधुकर दराडे (30, रा. आर. के. प्राइड अपार्टमेंट, समर्थनगर, शरदचंद्र पवार मार्केटच्या पाठीमागे, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार 12 ऑगस्ट दुपारी 3 ते 4 च्या सुमारास चोरट्यांनी दराडे यांच्या फ्लॅट क्र. 5 च्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्यांनी दराडे व त्यांची सासू मंगला सानप यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
यात 82,500 रुपयांचे 16.500 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, एक लाख रुपये किमतीची 2 तोळे वजनाची सोन्याची पोत, पाच ग्रॅम वजनाची 25 हजार रुपयांची सोन्याची अंगठी, 12 हजार 500 रुपयांची 2.500 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 16 हजार 250 रुपयांचे 3 ग्रॅम 250 मिली वजनाचे कानातील झुबे, 12 हजार 500 रुपयांचे अडीच ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या नथी, 55 हजार रुपयांचे 5 ग्रॅम वजनाची एक सोन्याची चेन व एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान, 55 हजार रुपयांचे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातले व दोन वेल व एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम पान, 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे 24 ग्रॅम वजनाचे सोन्याची एक चेन व एक तोळा वजनाची सोन्याची एक पोत व एक ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण पाच लाख 63 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करीत आहेत.