Success for the crime investigation team of Panchavati police station
नाशिक : घरफोडी करून पसार झालेल्या संशयित आरोपींना २४ तासांच्या आत मुद्देमालासह बेड्या ठोकण्यात पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले.
पंचवटी पोलिस ठाण्यात गेल्या गुरुवारी (दि. १७) रात्री ८.३० च्या सुमारास घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि. १८) गुन्हे शोध पथकाचे शिपाई कुणाल पचलोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत चोरट्यांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकातील अंमलदारांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, संशयित मयूर राजाराम जाधव (३०, रा. साई रो- हाउस, हिरावाडी, पाटाजवळ, पंचवटी), जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे (२१) व संदीप छोटूलाल कनोजिया (२५, दोघेही रा. गणेशवाडी, मुंजाबा चौक, पंचवटी) हे मिळून आले. त्यांनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांनी पंचांसमक्ष दिलेल्या निवेदनाप्रमाणे गुन्ह्यातील ५१ हजार रुपये किमतीच्या औषध बॉटलवरील ॲल्युमिनियमची झाकणे जप्त करण्यात आली आहेत.