नाशिक : बुलेटची चोरी करणारा अट्टल सराईत व चोरीच्या बुलेट खरेदी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा दोघांना गुन्हे शाखा युनिट-२ ने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून शहरातील सहा बुलेट चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत दि. २८ मे रोजी पाथर्डी शिवार येथून रात्री १० च्या सुमारास बुलेट चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या तपासाच्या अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, पोलिस हवालदार अतुल पाटील, मनोज परदेशी, संजय सानप, परमेश्वर दराडे, सुनील खैरनार यांनी तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक जण बुलेट चोरी करून जात असताना दिसला. पुढे पोलिसांनी तब्बल ३५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयितांचे नाव निश्चित केले. पोलिस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, पोलिस हवालदार संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत, अभय सुरेश खर्डे याने मागील काही महिन्यांपासून विविध पोलिस ठाणे हद्दीत बुलेट चोरी केल्या असून, त्यांची विक्री करण्यासाठी तो सिन्नर फाट्याकडून एकलहरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याचे समजले होते.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने एकलहरे रोड येथील गवळी बाबा देवस्थान येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने अभय सुरेश खर्डे (२३, रा. मु. पो. झोळे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असेे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीची बुलेट (एमएस १५, जीवाय ६९३५) व 15 हजार रुपये किमतीचा मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित अभय खर्डेकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्यावर उपनगर पोलिस ठाणे हद्दीत चार, तर भद्रकाली आणि इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत दोन असे एकूण सहा गुन्हे दाखल असून, त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीच्या सहा बुलेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, याप्रकरणी बुलेट खरेदी करणारा अनिकेत शिरीष पठारे (२५, रा. दापोडी, जि. पुणे) याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अभय खर्डेविरुद्ध पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत १८ बुलेट चोरीचे गुन्हे दाखल आहेत.