वणी (नाशिक): किरकोळ वादातून सख्ख्या भावाने भावाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना म्हेळुस्के गावात गुरुवारी (दि. 22) रात्री 9.30 च्या सुमारास घडली. वणी पोलिसांनी संशयितास अटक करत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला आहे.
म्हेळुस्के (ता. दिंडोरी) येथील हरी व शरद दत्तू बर्डे हे बंधू लखमापूरमधील राशी फर्टिलायझरसमोरील पेट्रोलपंपालगत असलेल्या परिचिताकडे गेले होते. तेथे त्यांचा वाद झाला. तेथून काही अंतरावरील फळ विहिरीजवळ पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात हरीने जुन्या भांडणाची कुरापत काढून भावाला शिवीगाळ केली. त्यातच शरदच्या छातीवर व मांडीवर धारदार चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शरदला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत हरी बर्डेला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.