नाशिक : मुलीची छेड काढल्याची खोटी तक्रार करण्याची धमकी देत प्रथम वर्षाच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण, दमदाटी करून त्यास अर्धनग्नावस्थेत रस्त्यात उभे करीत दोघांनी 'रॅगिंग' केल्याचा संतापजनक प्रकार एकहलरे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ घडला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या फिर्यादीनुसार, नाशिक रोड पोलिस ठाण्यात संशयित भूषण धात्रक व चेतन वलवे या दोघांविरोधात महाराष्ट्र छळवाद कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित हा जळगाव जिल्ह्यातील असून, एकलहरे येथील मातोश्री आसराबाई पॉलिटेक्निक महाविद्यालयात पदविकेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. दोन महिन्यांपासून तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी पीडित हा त्याच्या दोन मित्रांसोबत महाविद्यालयीन आवारालगत असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करीत होता. तेथे त्याच महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या वर्गात शिकणारा संशयित भूषण व त्याचा मित्र चेतन बसलेले होते. मित्रांना मारहाण का केली, असा प्रश्न विचारल्याचा दोन्ही संशयितांना राग आल्याने त्यांनी पीडित विद्यार्थ्यास मारहाण केली. दोघा संशयितांनी पीडिताला धरून बळजबरीने शर्ट काढायला लावला. तसेच मुलीची छेड काढल्याची खोटी तक्रार देण्याची भीती घालून पीडित विद्यार्थ्यास हॉटेलच्या बाहेर आणत सार्वजनिक रस्त्यावर अर्धनग्नावस्थेत उभे केले. यामुळे विद्यार्थ्यावर मानसिक आघात झाला. त्याने नाशिक रोड पोलिसांकडे दोघांविरोधात तक्रार देत रॅगिंग केल्याची फिर्याद दाखल केली आहे.