नाशिक : सीबीआय व ट्रायमधून बाेलत असल्याचे भासवून भामट्यांनी नाशिकमधील सनदी लेखापालास मनी लाँन्ड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची भिती घालून डिजिटल हाऊस अरेस्ट केल्याचे भासवत 42 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. दरम्यान, वेळीच तक्रार आल्याने सायबर पोलिसांनी तपास करीत संशयितांच्या बँक खात्यातील 42 पैकी 18 लाख रुपये गोठवले आहेत.
सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, दि. 2 ते 31 डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला. भामट्यांनी सनदी लेखापालास व्हाटस्पॲप व माेबाईलवरुन संपर्क साधत, 'आम्ही टेलिफाेन रेग्युलेटरी अॅथारिटी ऑफ इंडिया (ट्राय) तसेच अंधेरीतील सीबीआय' (केंद्रीय अन्वेषण विभाग) कार्यालयातून बाेलत असल्याचे सांगितले. भामट्यांनी स्वत: पोलिस असल्याचे भासवत व्हिडीओ कॉलवरून भिती घातली. 'तुम्ही केलेल्या काही व्यवहारांत अनियमितता आढळली आहे, तुमचे आधार कार्ड व माेबाईलवरुन संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि पैशांची देवाण घेवाण मनीलाँन्ड्रिंगच्या पद्धतीने झाली आहे.
तुुमची सर्वच कुंडली आमच्याकडे असून आतापर्यंतच्या तपासानुसार तुम्ही मनीलाँन्ड्रिंग केल्याचे निष्पन्न झाले आहे. तुम्हाला हाेम अरेस्ट करणे गरेजचे आहे' असे सांगत हाऊस अरेस्ट केल्याचे भासवले. सनदी लेखापालास भिती घालून अटकेतून सुटका करावयाची असल्यास आम्ही जे सांगू ते करा अन्यथा 20 ते 35 वर्षांपर्यंत तुरुंगात राहून जीवन जगा, असा धाक दाखविला. त्यानंतर, भामट्यांनी सनदी लेखापालाच्या बँक खात्यातील 42 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. पैसे जमा झाल्यानंतर भामट्यांनी माेबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे कळताच, सनदी लेखापालाने सायबर पाेलिस ठाणे गाठून तक्रार केली.
सनदी लेखापालाची तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी, भामट्यांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे घेतले त्या खात्यांची चौकशी केली. भामट्यांनी ४२ लाख रुपये पुणे, मुंबई, काेईम्बतूर, उत्तरप्रदेशामधील काही संशयास्पद बँक खात्यांत वर्ग केल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी वेळीच दखल घेत मुंबई व पुण्यात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनुक्रमे चार व चाैदा असे एकूण 18 लाख रुपये गोठवलेत. त्यामुळे सनदी लेखापालास काहीसा दिलासा मिळाला आहे.