नाशिक : परदेशी कंपनीचा संचालक असल्याचे भासवत भामट्यांनी शहरातील एकाला वनस्पती तेल खरेदी करण्याच्या बहाण्याने १६ लाख ७५ हजार रुपयांना गंडा घातला. मानवी आराेग्यासह पशुपक्ष्यांच्या आहारात ट्रायफा, सिएटा वनस्पतीचे तेल 'आराेग्यवर्धक' असून, तेल खरेदी करण्याचे सांगत भामट्यांनी हा गंडा घातला.
पाथर्डी फाटा भागातील नागरेनगरमधील ४५ वर्षीय रहिवासी महेंद्र अंधारे यांच्या फिर्यादीनुसार, दि. १ एप्रिल ते २ मे दरम्यान त्यांची फसवणूक झाली. त्यांची केमिकल सप्लाय व ट्रेडिंगची चेन आहे. त्यांना भामट्यांनी दाेन ई-मेल आयडीवरून संपर्क साधला होता. 'मी न्यूयाॅर्क येथील बिंग्टाॅन भागातील हेल्थकेअर लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीचा संचालक आहे. तुमच्या कंपनीमार्फत आम्ही चार लाख आठ हजार रुपये प्रतिलिटर दराने ५१ लिटर ट्रायफा, सिएटा ऑइल खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी प्राेसेस आणि तेलाची गुणवत्ता पडताळून घ्यावी लागेल असे भामट्यांनी सांगितले हाेते. त्यानंतर संशयितांनी अंधारे यांना पुणे येथून एक लिटर ऑइल संबंधित एजन्सीतून खरेदी करण्यास लावले व त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नायजेरियन नागरिकाला पाठविले. त्या नायजेरियन व्यक्तीने ऑइल परिपूर्ण गुणवत्तेचे असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, भामट्यांनी अंधारे यांना पुणे येथील स्थानिक वितरक प्रीती नायर, लक्ष्मी एन्टरप्रायजेस यांच्याकडून १० लिटर तेल खरेदी करण्यास सांगितले. त्यानुसार अंधारे यांनी पैसे देऊन तेल खरेदी केले होते. तेल नाशिकला पोहोचल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंधारे यांनी भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र होऊ शकला नाही. त्यामुळे अंधारे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
भामट्यांनी अंधारे यांना नाशिकला तेल पोहोचवले. नाशिकमध्ये तेलाची गुणवत्ता पडताळली असता, ट्रायफा, सिएटा ऐवजी कारच्या रेडिएटरमध्ये टाकले जाणारे २५० रुपये प्रतिलिटर दराचे कुलन्ट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे भामट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला.