नाशिक : सोसायटी तळमजल्यावर कॅफे सुरु करून तेथे जोडप्यांना आडोसा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेचालकांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने दोघांनाही जामीन दिला आहे.
आकाश ए. बच्छाव (२७, रा. बोरगड) व आदित्य सी. सोनवणे (२८, रा. म्हसरुळ) अशी कॅफचालकाची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा संशयितांनी तरुण मुलामुलींना अश्लिल कृत्य करता यावे यासाठी मोगलीज कॅफे सुरु करून त्यात पडदे टाकून अंधुक प्रकाश ठेवला. तसेच भिंतीवर अश्लिल पोस्टर्स, पेटींग, प्रेमभावना दर्शवनारे लिखाण करून जोडप्यांना प्रोत्साहन दिले.
सार्वजनिक ठिकाणी आरोग्यास अपायकारक होईल असे काेंदट वातावरण निर्माण केल्याचा ठपका दोघांवर आहे. त्याचप्रमाणे कॅफेत आग लागल्यास किंवा इतर दुर्घटना घडल्यास पर्यायी मार्ग नसल्याने अनर्थ घडण्याचा धोका होता. त्यामुळे दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोघांना अटक केली. न्यायालयाने दोघांना जामीन दिला आहे. या कारवाईमुळे कॅफेचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.