नाशिक : गौरव अहिरे
शहरातील गंगापूर रोडवरील एका कॅफेत आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकून तरुणाईस अश्लील कृत्य करताना पकडले. या कारवाईने कॅफेतील 'आडोसा' पुन्हा एकदा उघड झाला आहे. मात्र, नाशिक महानगरपालिका, पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागांच्या दुर्लक्षामुळे कॅफेचालकांची मनमानी वाढत असून, त्यामुळे तरुणाई चुकीच्या मार्गावर जात आहे. तर अनेक गंभीर गुन्हे घडल्याने कॅफेंमधील आडोसा कायमस्वरूपी काढण्याची मागणी होत आहे.
तरुणाईचे पाऊल चुकीच्या मार्गावर
एकांतवासासाठी विशिष्ट वेळेला प्राधान्य
दर ताशी ठरावीक रकमेचा व्यवसाय जोमात
चिंतेचा विषय ! शिक्षणाच्या नावाखाली अल्पवयीन मुले- मुलींची पावले कॅफेच्या दिशेने
सिन्नर येथील एका कॅफेमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना २०२३ मध्ये समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी पुढाकार घेत शहरात कॅफेंची तपासणी माेहीम राबवली. त्यात ९ ते १० कॅफेंमध्ये तरुणाईस आडोसा उपलब्ध करून दिल्याचे, विनापरवानगी अंतर्गत रचनेत बदल केल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर कारवाईत ढील पडल्याने 'कॅफे कल्चर' पुन्हा रुजण्यास सुरुवात झाली. शहरातील शैक्षणिक संस्थांभोवती हे कॅफेंचे जाळे पाहावयास मिळत आहे.
शहरामधील अनेक कॅफेमध्ये आकर्षक सजावट करण्यासाठी इमारतीच्या मूळ संरचनेमध्ये बदल केल्याचे आढळले आहे. तसेच काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पार्टिशन टाकले असून, या कॅफेंची महापालिकेकडे नोंद नसल्याचे समजते. तसेच घरपट्टी रेकॉर्डवरदेखील व्यावसायिक स्वरूपाच्या वापराची नोंद आहे की, नाही याची पडताळणी होत नसल्याचे बोलले जाते. शहरात काही हॉटेलचालकांनी ग्राहकवर्ग म्हणून फक्त महाविद्यालयीन तरुण- तरुणींनाच केंद्रित ठेवून कॅफेंची रचना केली आहे. त्यात आकर्षक अंतर्गत सजावटीसह जोडप्यांना सुरक्षितता- आडोसा देण्यास प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे आवश्यक वेळ, आडोसा आणि खिशाला परवडणारा दर यामुळे सकाळपासूनच या हॉटेल-कॅफेबाहेर तरुणाईची गर्दी पाहावयास मिळते. कॅफेमध्ये विशिष्ट आडोसा मिळवण्यासाठी स्पर्धा असल्याचे बोलले जाते. त्यासाठी नियमित येणारे जोडपे आडोसा मिळवण्यासाठी विशिष्ट वेळी येण्यास प्राधान्य देतात. जोडप्यांच्या गर्दीत अल्पवयीन मुले- मुलीही दिसत असल्याने शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर पडल्यानंतर त्यांची पावले या कॅफेच्या दिशेने वळत असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.
अनेक कॅफेंमध्ये खाद्यपदार्थ चांगले मिळत नसल्याचे बोलले जात असले तरी तेथील आडोसा चांगला असल्याने जोडप्यांची या कॅफेंना पसंती असल्याचे दिसते. त्यासाठी काही कॅफेचालक एकांतवास उपलब्ध करून दर ताशी ठरावीक रक्कम जोडप्यांकडून घेतात. तर काही ठिकाणी ठरावीक रकमेच्या पुढे खाद्यपदार्थांचे पैसे झाल्यास अतिरिक्त चार्ज घेतला जात नसल्याचे दिसते.
शहरात निर्भया पथकाकडून तरुण-तरुणींची चौकशी होते, मात्र, आता संवाद कमी झालेला दिसतो. तसेच कॅफे, हॉटेल, पानटपरींकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. दरम्यान, कॅफेतील खाद्यपदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकांत शोधण्यासाठी आलेल्या जोडप्यांना नकळत आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर नगररचना विभागाकडूनही कॅफेंची नियमित तपासणी होत नसल्याने कॅफेचालक अंतर्गत रचनेत मनमानी पद्धतीने बदल करीत तरुणाईस आडोसा देत आहेत.
काही हॉटेल- कॅफेमध्ये सीसीटीव्ही नाहीत. असले तरी बंदस्थितीत असतात. त्यामुळे जोडप्यांवर कोणाचेच लक्ष राहत नाही.
कॅफेचा दर्शनी भाग काळ्या काचेने किंवा इतर स्टिकर लावून झाकून टाकला जातो. त्यामुळे कॅफेमधील हालचाली दिसत नाहीत.
काही ठिकाणी वरील मजल्यावरही बसण्याची सुविधा असल्याने तेथे 'प्रायव्हसी' मिळत असल्याने तरुणाईची गर्दी असते.
वाढदिवस, व्हॅलेंटाइन डे, कॉलेज डे असल्यास कॅफेमध्ये अंतर्गत सजावट असल्याने सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणीत होत असल्याने तरुणाईची गर्दी होते.
रहिवासी किंवा वर्दळीच्या परिसरापासून लांब असलेल्या कॅफेंना जोडप्यांची पसंती.
कॅफेत बसण्यासाठी जागा, सोफा तसेच आडोसा उपलब्ध करून देतात.
शहरासह ग्रामीण भागात कॅफेमध्ये अत्याचार, विनयभंग झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तसेच कॅफेचालकास मारहाणीची घटना, तरुणांमधील मारहाणीचे प्रसंग अनेकदा घडले आहेत. तर एका कॅफेचालकाकडे पोलिस कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
कॅफेंविरोधात तक्रारी मिळाल्या आहेत. सर्वेक्षण करून संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल.सचिन जाधव, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग, मनपा
गंगापूर रोडवरील कॅफेतील अश्लील कृत्य उघडकीस आणल्यानंतर आ. देवयानी फरांदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी साेमवारी (दि. ३) मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत शहरातील कॅफेंचा विषय मांडला. त्यात अनधिकृत, अंंतर्गत रचनेत बदल केलेल्या कॅफेंवर कारवाईची मागणी फरांदे यांनी केली आहे. त्यास खत्री यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नगररचना विभागास सूचना दिल्या आहेत.
आम्ही मनपा प्रशासनास गंगापूर, सरकारवाडा, आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, मुंबई नाका पोलिस ठाण्यांमधील सुमारे ५२ कॅफेंची माहिती दिली आहे. मनपातर्फे या कॅफेंची शहानिशा केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास मनपाच्या कारवाईस पोलिस बंदोबस्त पुरवला जाईल. नियमित तपासणीही केली जाणार आहे.किरणकुमार चव्हाण, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१
कॅफे म्हणजे थाेडा वेळ निवांत बसणे आणि नाश्ता, गप्पा मारण्यासाठी ग्राहकांचे आवडते ठिकाण आहे. मात्र, काही कॅफेंमध्ये अनधिकृतपणे प्रायव्हसीच्या नावाखाली फेरबदल केले जातात. त्यामुळे प्रशासनाकडून अशा कॅफेंवर कारवाई करणे योग्यच आहे. संबंधित कॅफेंना आवश्यक असलेल्या परवान्यांचीही तपासणी केली पाहिजे.संजय चव्हाण, अध्यक्ष, हाॅटेल ॲण्ड बार असोसिएशन, नाशिक