ठळक मुद्दे
भिकाऱ्याची डोक्यात पेव्हरब्लॉक घालून दिवसाढवळ्या फुटपाथवर हत्या
मित्रांसोबतच्या झटापटीत एका तरुणाचा संशयस्पदरीत्या मृत्यू
नाशिक शहरात एकाच दिवसात खूनाच्या दोन घटना
नाशिक : मैत्रिणीची छेड काढली म्हणून तिघा विधिसंघर्षित बालकांनी एका ५० वर्षीय भिकाऱ्याची डोक्यात पेव्हरब्लॉक घालून दिवसाढवळ्या फुटपाथवर हत्या केली. तर पहाटे ५.३० च्या सुमारास मित्रांसोबतच्या झटापटीत एका तरुणाचा संशयस्पदरीत्या मृत्यू झाल्याचे समोर आले. या दोन घटनांनी शहर हादरले असून, पोलिसांनी तीन विधिसंघर्षित बालकांसह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी (दि. २) या दोन्ही धक्कादायक घटना समोर आल्या. ठक्कर बाजारच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या फुटपाथवर एका ५० वर्षीय भिकाऱ्याची तीन अल्पवयीनांनी डोक्यात पेव्हरब्लाॅक घालून हत्या केली. डोक्यास जबर मार लागल्याने, हा व्यक्ती जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी नागरिकांची मोठी वर्दळ होती. मात्र, या अल्पवयीनांना कुणीही रोखले नाही. उलट या अल्पवयीनांनी घटनास्थळी हातवारे करीत नृत्य केले. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. तर दुसरी घटना राजीव गांधी भवन शेजारील पीएनजी, बाफना ज्वेलर्ससमोर घडली. मित्रांमध्ये झालेल्या झटापटीत शानू सैदाप्पा वाघमारे (२६, कस्तुरबानगर, होलाराम कॉलनीसमोर, नाशिक) असे मृत तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. या तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही घटना सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल आहेत.