सिडको (नाशिक) : प्रेमाच्या जाळ्यात ओढून सहा वर्षे तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये राहून तिला अंधारात ठेवत स्वतःचे परस्पर लग्न जमवून फसवणूक आणि जीवनयात्रा संपवली प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तरुणास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ललिता थोरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी कस्तुरीने राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती. याप्रकरणी सुरुवातीस अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तिची आई ललिता थोरातने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी ऋतिक शरद हिवाळे (२५, रा. पाथर्डी फाटा) याने मयत कस्तुरीला प्रेमाचे जाळ्यात ओढून सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिला. नंतर तिला कोणतीही कल्पना न देता स्वतःचे परस्पर लग्न जमवून तिची फसवणूक केली. त्याची आई मुक्ता आणि वडील शरद हिवाळे यांना याबाबत कल्पना होती. लग्नास नकार देत मुक्ता हिवाळे यांनी कस्तुरीला फोनवर शिवीगाळ केली. यामुळे तिला मानसिक धक्का बसल्याने तिने राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ऋतिक हिवाळे, मुक्ता हिवाळे आणि शरद हिवाळे यांच्या विरोधात जीवनयात्रा संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ऋतिक हिवाळे यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.