Builder Naresh Karda Cheque Bounce Case
नाशिक : बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना गुंडाविरोधी पथकाने रविवारी (दि. ३) ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणी अटक वॉरंट जारी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी आर्थिक फसवणुकी प्रकरणी कारडा यांना नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
सन २०२२ मध्ये कारडा कन्स्ट्रक्शनविरुद्ध उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्हा न्यायालयात धनादेश न वटल्याबाबत दावे दाखल करण्यात आले होते. मात्र, कारडा हे पसार असल्याने संशयित कारडांसह इतरांविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. संशयित कारडा यांच्याविरोधात न्यायालयाने चार अटक वॉरंट जारी केले होते.
मात्र, अशातही कारडा पोलिसांसमोर किंवा न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यातच कारडा यांचा मोबाइल बंद असल्याने, उत्तर प्रदेश पोलिसांना त्यांचा शोध घेणे शक्य होत नव्हते. अशात उत्तर प्रदेश पोलिसांनी नाशिक पोलिसांची मदत घेऊन संशयित कारडा यांचा ठावठिकाणा सोधला. गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी द्वारकाजवळील कांदा- बटाटा भवन येथे सापळा रचून कारडा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कारडा यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. आता पुन्हा एकदा अटक केल्याने, कारडा यांच्या अडचणी वाढणार आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांकडे ताबा
गुंडाविरोधी पथकाने कारडा यांना ताब्यात घेतले असून, लवकरच त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांकडे दिला जाणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक नाशिकमध्ये लवकरच दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना कारडा यांचा ताबा घेतल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.