मनमाड : सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न झालेला आहे. अशीच धक्कादायक घटना रविवार, २३ मार्चच्या रात्री गोरखपूर- बंगळुरू विशेष रेल्वेत भुसावळ- मनमाड दरम्यान घडली. गाडीत प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तिकीट परीक्षकाने (टीटीई) केला. भेदरलेल्या युवतीने प्रसंगावधान राखत स्वत:ला डब्यातील शौचालयात कोंडून घेत अतिप्रसंग टाळला. यादरम्यान, रेल्वे पोलिस कंट्रोलरूमशी संपर्क साधत मदत मिळवली. त्यावर यंत्रणा सक्रिय होऊन संशयित टीटीईला अटक करण्यात आली.
रेल्वे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २२ वर्षांची युवती कानपूरहून पुण्याला प्रवास करत होती. तिच्याकडे कन्फर्म तिकीट नव्हते, तर आरएसी तिकीट होते. तिने संशयित, तिवारी नामक टीटीईकडे सीट उपलब्धतेबाबत विचारणा केली असता, त्याने तिला बी- ४ कोचमध्ये बसण्यास सांगितले. मात्र, तेथे जागा नसल्याने त्याने तिला ए- १ कोचमध्ये ५ नंबरचे सीट दिले होते. काही वेळाने तो तिच्याजवळ आला व तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. प्रथम तिला हे अनवधानाने झाले असावे असे वाटले, परंतु त्याने पुन्हा तीच कृती केल्याने ती घाबरली व शौचालयात जाऊन लपली. तेथून वडिलांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.
वडिलांनी तत्काळ रेल्वे पोलिस कंट्रोलरूमशी संपर्क साधत उद्भवलेला प्रसंग सांगत गाडी आणि घटनास्थळाची माहिती दिली. गाडी मनमाड स्थानकाजवळ पोहोचण्याच्या वेळी पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवर तैनात राहून कारवाई केली. गाडी येताच त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. तरुणीने मनमाड येथे उतरून अधिकृत तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. ही घटना भुसावळ पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने पुढील तपास भुसावळ पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.