नाशिक : इन्स्टाग्रामवरुन ओळख करीत एकाने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला, तर दुसऱ्या संशयिताने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली आहे. तसेच इतर सहा जणांनी पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन, आडगाव पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या दोघांसह इतर आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांमध्ये एका तरुणीचा समावेश असून तिने पीडितेस धमकावल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड येथील रहिवासी असलेल्या व सध्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय पीडितेवर दोघा संशयितांनी अत्याचार केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर संशयित ऋषिकेश नितीन कुंदे (रा. निफाड) याने एकदा चांदोरी बसस्थानकातून पीडितेस बळजबरीने नेत ओढा व नाशिकमध्ये अत्याचार केला. तर संशयित अझहर तांबोळी यानेही इन्स्टाग्रामवरून ओळख करीत प्रेमसंबंध प्रस्थापित करून पीडितेस विवाहाचे आमिष दाखवले. त्यानंतर अझहरने वारंवार अत्याचार केले. डिसेंबर 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत हा प्रकार घडला. तसेच संशयित ऋषिकेश सोनवणे, कामिल शेख, फिरोज तांबोळी, रफिक तांबोळी, अरबाज शेख, स्वप्निल खडताळे यांनी पीडितेकडे शरीरसंबंध ठेवण्याबाबत मागणी केली. तर एका मुलीने पीडितेस धमकावले. त्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात एका मुलीसह नऊ तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, ओढा, निफाडमधील करंजगाव, त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील लॉजवर नेत संशयितांनी वारंवार अत्याचार केला. त्यामुळे या ठिकाणी लॉजधारकांनी दोघांची अधिकृत नोंद करून त्यांना लॉजमधील खोली उपलब्ध करून दिली होती का? संबंधित लॉज अधिकृत आहेत का असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याआधीही त्र्यंबकरोडवरील लॉजमध्ये अल्पवयीन मुलींसह तरुणींवर अत्याचार झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लॉजचा व तेथील ग्राहकांच्या नोंदींचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे.