इंदिरानगर: पाथर्डी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटलजवळ दुचाकीने जोरदार धडक दिल्याने ४१ वर्षीय महिलेच्या डोक्यास जबर मार लागल्याने उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी अकराच्या सुमारास लताबाई सुभाष ताळीकोटे या प्लॅटिना हॉस्पिटलनजीक पायी जात असताना दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ताळीकोटे यांच्या डोक्यास व हातापायासह पोटास जबर मार लागला. त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताळीकोटे यांना मृत घोषित केले. याबाबत अज्ञात दुचाकीस्वारावर इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.