नाशिक : गंगापूर रोडवरील मोगली कॅफेवर अचानक छापा टाकत तेथील गैरप्रकार समोर आणल्यानंतर भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शहरातील सर्वच अनधिकृत कॅफेंबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, पोलिस प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. ३) फरांदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेत अनधिकृत कॅफेंवर कारवाईची मागणी केली. आयुक्त खत्री यांनी तातडीने दखल घेत शहरातील सर्व कॅफेंचे सर्वेक्षण करून अधिकृत आढळणाऱ्या कॅफेंवर कारवाईचे आदेश नगररचना विभागाला दिले आहेत.
शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड यासह विविध ठिकाणी सर्रासपणे कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू आहेत. यासंदर्भात आ. फरांदे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी पोलिस खात्याकडे संबंधित कॅफेंवर कारवाईची मागणी केली होती, मात्र, पोलिस प्रशासनाकडूनही पुरेसे गांभीर्याने त्याकडे लक्ष दिले गेले नाही. यामुळे फरांदे यांनी स्वत:च शनिवारी (दि. १) गंगापूर रोडवरील मोगली नामक कॅफेमध्ये धाड टाकत त्याठिकाणी सुरू असलेला प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यामुळे शहरातील अनेक कॅफेंमध्ये गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारींना पुष्टीच मिळाली असून, अनेक कॅफेंच्या बांधकामांना तसेच अंतर्गत बदलांना आणि वापरात केलेल्या बदलांना मनपाच्या नगररचना विभागाची परवानगीच नसल्याची बाबदेखील निदर्शनास आली आहे. सोमवारी आ. फरांदे यांनी शहरातील विविध प्रश्नांवर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शहरातील अनधिकृत कॅफेंच्या मुद्याकडेही फरांदे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली.
आयुक्तांनी या मागणीची तत्काळ दखल घेत नगररचना विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगररचना विभागाकडून मंगळवार (दि. ४)पासून शहरातील कॅफेंचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सहाही विभागांतील कॅफे तसेच संशयास्पद मिळकतींच्या बांधकामांची पाहणी केली जाणार आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, नाना शिलेदार, माजी नगरसेवक मुन्ना हिरे, स्वाती भामरे, यशवंत निकुळे, अजिंक्य साने, शिवाजी गांगुर्डे, चंद्रकांत थोरात, मिलिंद भालेराव आदी उपस्थित होते.
इंदिरानगर परिसरातील जनावरांचे अनधिकृत गोठे तसेच अशोका मार्ग परिसरातील बेकायदेशीर लॉन्समुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडेही आ. फरांदे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. बेकायदेशीर लॉन्सवर कारवाई करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली. गंगापूर रोडवरील अनधिकृत भाजीबाजारावर तत्काळ कारवाई करण्याची मागणीदेखील आ. फरांदे, माजी नगरसेवक मुन्ना हिरे, स्वाती भामरे यांनी केली.
शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहेत. त्याविषयी आयुक्तांच्या निदर्शनास अनेक बाबी आणून दिल्या आहेत. कॅफेंबाबतही पोलिस आणि महापालिका यांना कारवाई करण्याविषयी सूचना दिल्या आहेत.देवयानी फरांदे, आमदार, नाशिक.