नंदुरबार : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डाऊनलोड केलेल्या एका अॅपच्या माध्यमातून तब्बल २५ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झालेल्या डॉक्टराला ८ लाख २१ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात नंदुरबार सायबर पोलिसांना यश मिळाले आहे. ही रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
कोरीटनाका परिसरात राहणारे डॉ. मार्तंड देशपांडे यांना शेअर मार्केटविषयी चांगले ज्ञान असल्याने ते वेळोवेळी गुंतवणूक करीत असत. काही दिवसांपूर्वी त्यांना मोबाईलवरून "शेअर मार्केटचे प्रशिक्षण हवे असल्यास व्हॉट्सअॅप गटात सहभागी व्हा" असा संदेश प्राप्त झाला. त्यांनी त्या गटात सहभागी होताच, चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले.
अनोळखी व्यक्तीच्या या आमिषाला बळी पडून डॉ. देशपांडे यांनी अॅप डाऊनलोड केले. त्यातून त्यांची एकूण २५,६६,०१७ रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४२०, ३६६(३) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस सेलचे प्रभारी अधिकारी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान फसवणूक करणाऱ्यांची बँक खाती शोधून ती गोठवण्यात आली. त्यातील ८ लाख २१ हजार रुपयांची रक्कम गोठवून न्यायालयाच्या आदेशाने ती डॉ. देशपांडे यांना परत मिळवून देण्यात आली.
या कामगिरीबद्दल डॉ. देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू असून, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी कोणतेही ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, चंद्रशेखर बडगुजर, हितेश पाटील, विजय गावित, किरण जिरेमाळी, प्रदीप पावरा, पवन पाटील, राहुल तडवी, सुभाष वळवी, देवीदास महाले यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.