नंदुरबार : नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी करत एक घरफोडी व चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, 9 मोटारसायकलींसह एकूण 2,81,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सर्व पोलीस ठाण्यांना वेळोवेळी निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांमध्ये सलगपणे पाच गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तपासात बंटी ऊर्फ राकेश प्रभाकर मराठे (वय 34, रा. फकिरा शिंदे नगर, नंदुरबार) आणि लक्ष्मण ऊर्फ लखन अंबालाल चौधरी (वय 30, रा. सेवाग्राम नगर, नंदुरबार) यांनी नंदुरबार शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातून एकूण नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
तसेच, चेतन अरुण अहिरे (वय 26, रा. ब्राम्हणगाव, सटाणा, जि. नाशिक) याला धुळे चौफुली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने दारू दुकानाजवळून दुचाकी चोरी, तसेच दुकानात रात्री प्रवेश करून दारू चोरी केल्याची कबुली दिल्याले गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंतकुमार पाटील, विकास गुंजाळ, दिपक बुनकर, नरेंद्र चौधरी, पंकज महाले, भटू धनगर, निंबाबाई वाघमोडे, रोहिणी धनगर, प्रविण वसावे, राहुल पांढारकर, किरण मोरे, भगवान मुंडे, हरिष कोळी, ललित गवळी ही यशस्वी कारवाई पार पडली.