नांदेड : विवाहितेचा नवरा अपघातात मरण पावल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याचमुळे आमचा मुलगा मरण पावला असा आरोप तिच्यावर केल्यानंतर विवाहितेने जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. तसेच विवाहीता स्नेहा हिला एक मुलगी झाली म्हणून मुलगा का झाला नाही म्हणून वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळलेल्या विवाहीता स्नेहाने घरी गळफास घेऊन जीवन संपवले आहे.
याप्रकरणी जवळपास १६ महिन्यांनंतर नायगाव न्यायालयाने त्या महिलेच्या प्रकरणात न्याय दिला असून महिलेच्या सासू, सासरा, भाया आणि दिराविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश नायगाव पोलिसांना दिले आहेत.
रामकिशन माधवअप्पा हिंगणकर यांनी नायगाव न्यायालयात दाखल केलेल्या किरकोळ फौजदारी अर्ज क्रमांक ४६/२०२४ प्रमाणे त्यांची मुलगी स्नेहा हिचे पती अरविंद भाऊराव बेंद्रीकर हे ६ एप्रिल २०२४ रोजी नांदेड येथून आपली नोकरी संपवून बेंद्री, ता. नायगाव या गावाकडे दुचाकीवर जात असताना अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची पत्नी अर्थात रामकिशन हिंगणकर यांची मुलगी स्नेहा हिला नांदेडच्या रुग्णालयात घेऊन आले होते. परंतु स्नेहा यांचे पती अरविंद यांचा मृत्यू झाला होता. घरी जाताना आणि घरी गेल्यावर स्नेहाचा सासरा डॉ. भाऊराव बाबूराव बेंद्रीकर, सासू कुसुमबाई भाऊराव बेंद्रीकर, भाया आशिलेश भाऊराव बेंद्रीकर, दीर पंडित बाबूराव बेंद्रीकर या चार जणांसह इतर पाच जणांनी स्नेहाचा छळ केला. त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुझ्यामुळेच आमचा मुलगा मरण पावला. यासंदर्भाने नायगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.
रामकिशन हिंगणकर यांनी या संदर्भाने एक तक्रार अर्ज नायगाव पोलिस ठाण्यात दिला होता. परंतु नायगाव पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे रामकिशन हिंगणकर यांनी नायगाव न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल करून नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली. या प्रकरणात न्यायालयासमक्ष सादर करण्यात आलेले कागदपत्र आणि युक्तिवाद या आधारावर न्यायायलाने डॉ. बाबुराव बेंद्रीकर, त्यांच्या पत्नी कुसुमबाई आणि दोन
मुले आशिलेश आणि पंडित या चार जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (ब), ३०६, ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे नायगाव पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश नायगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.टी. गिते यांनी दिला आहे. या प्रकरणात रामकिशन हिंगणकर यांच्यावतीने ॲड.एम. एम. शेख यांनी काम पाहिले.