नाशिक : दादरा-नगर हवेलीच्या सिल्वासा येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याची नाशिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उकल झाली. बुधवारी (दि. १८) रात्री गस्तीवर असलेल्या युनिट एकच्या पथकाने संशयास्पदरीत्या फिरणारी एक कार थांबवून चौकशी केली. या कारमधील सहा जणांविरुद्ध सिल्वासा येथे खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व संशयितांना ताब्यात घेतले.
गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह परिसरात फिरत असलेली डीएन ०९ एल २५७८ क्रमांकाची कार युनिट एकचे सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये यांच्या पथकाच्या निदर्शनास आली. कार थांबवून चौकशी केली असता त्यात आनंद शेषनाथ सेठ (२७), संतोष अजय जाधव (३६) मितेश ऊर्फ मोटू अमृतभाई हलपती (३२), प्रेम शरद रामपूरकर (२१), कैशल अरविंद आचार्या (३४) मोंटूकुमार सुचित पासवान (३५, रा. सर्व सिल्वासा) अशी नावे सांगितली. त्यांच्या हालचालींवरून संशय बळावल्याने पोलिसांनी आनंद यास विश्वासात घेत विचारपूस केली असता हे खुनाच्या गुन्ह्यातील संशयित असल्याचे समोर झाले. त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक भाये यानी सिल्वासा पोलिसांशी संपर्क साधत सहाही संंशयितांना सिल्वासा पोलिसांच्या ताब्यात दिले .
आनंद सेठ याने सांगितल्यानुसार, त्याच्यावर २६ जून २०२४ रोजी मित्र कुणाल ऊर्फ जानकीनाथ सूरज जाधव याने दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो बचावला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांपूर्वी कुणालने पुन्हा धमकी दिली होती. त्यामुळे आनंद मित्रांच्या मदतीने गेल्या मंगळवारी (दि. १७) सायंकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान, मित्र मोटू ऊर्फ मितेश हलपती, संतोष जाधव व त्याचा मित्र धर्मेश यांच्या कारमध्ये बसून आम्ली फवारा (छत्रपती शिवाजी महाराज चौक), सिल्वासा येथे गेले. त्याठिकाणी कुणालचे एका रिक्षाचालकाशी भांडण सुरू होते. तेव्हा त्याला भांडणातून सोडवून कारमध्ये घेऊन एचआर ढाब्याच्या बाजूला मोकळ्या जागेत घेऊन गेले. याठिकाणी त्याने पुन्हा दमबाजी केल्याने व पूर्वी केलेल्या फायरिंगचा वचपा काढण्यासाठी सर्वांनी त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. यातच ता बेशुद्ध पडल्याने, सर्वांनी तेथून पोबारा केला होता.