मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 
क्राईम डायरी

Mumbai APMC Dry Fruit Scam | एपीएमसीमध्ये 44 कोटींचा सुकामेवा घोटाळा

सुकामेवा व्यापार्‍याला महसूल गुप्तचर संचालनालयाकडून अटक

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) सुकामेवा विभागातून सीमा शुल्क चोरीच्या घोटाळ्यांपैकी मोठा असलेला आक्रोड आयात घोटाळा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) धडक कारवाईनंतर उघडकीस आला आहे.

सुकामेवा घोटाळा प्रकरणात व्यापारी स्नेह दीपकभाई काकडिया आणि त्याचे वडील दीपक काकडिया यांच्यावर सीमा शुल्क कायद्यान्वये गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या घोटाळ्यात तब्बल 44 कोटी रुपयांच्या महसूल चोरीचा आरोप असून, दीपक काकडिया फरार आहे, तर त्याचा मुलगा स्नेह काकडियाला सुरत विमानतळावरून देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना बुधवारी 25जून रोजी अटक करण्यात आली आहे.

या घोटाळ्यात चिलीहून आयात करण्यात आलेल्या आक्रोडाच्या चलनात मोठी हेराफेरी करण्यात आली होती. प्रत्यक्षात आक्रोडाची आयात किंमत 2 डॉलर 70 सेंट प्रतिकिलो असताना, इनव्हॉइसमध्ये ती केवळ 1 डॉलर 50 सेंट प्रतिकिलो दर्शवण्यात आली. त्यामुळे शंभर टक्के मूलभूत सीमा शुल्क वाचवत सुमारे 44 कोटी रुपयांचा महसूल सरकारला न देता बुडवण्यात आला. ही फसवणूक दीपक ट्रेडिंग कंपनी या नावाने करण्यात आली असून, एकूण 3,610 मेट्रिक टन आक्रोड चुकीच्या मूल्यांकनावर आधारित चलनावर देशात आणण्यात आले होते. तपासादरम्यान दुबईस्थित ‘युरो सेवन जनरल ट्रेडिंग’ या कंपनीच्या माध्यमातून बनावट चलने फिरवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

तसेच, कर्मचार्‍यांच्या नावावर बनावट कंपन्या तयार करून त्या कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. डीआरआयने स्नेह काकडियाच्या ई-मेल खात्यातून बनावट चलन, विमा कागदपत्रे आणि हवाला व्यवहारांचे डिजिटल पुरावे जप्त केले असून, चौकशीदरम्यान तो सहकार्य करत नसल्याचेही अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

ईडीकडून कारवाईची शक्यता

हा प्रकार केवळ सीमा शुल्क चोरीपुरता मर्यादित राहिलेला नसून, आता यामध्ये हवाला व्यवहार, परकीय चलन कायद्याचे उल्लंघन आणि मनी लाँडरिंगचे पैलूही समोर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एका सामाजिक संस्थेने अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच ईडीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दीपक काकडिया दिल्लीतील काही प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहितीही तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाचा संशय व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT