Drug mafia El Mencho | ड्रग्ज माफिया एल मेंचो! 
क्राईम डायरी

Drug mafia El Mencho | ड्रग्ज माफिया एल मेंचो!

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

मेक्सिको म्हणजे जगभरातील ड्रग्ज माफियांचा जणू काही स्वर्गच..! ड्रग्जचे जगातील झाडून सगळे प्रकार इथे विनासायास उपलब्ध होतात आणि प्रामुख्याने इथूनच जगभर ड्रग्जची तस्करी चालते. एकेकाळी मेक्सिकोतील या ड्रग्ज साम्राज्यावर पाब्लो एस्कोबार या ड्रग्ज माफियाचे वर्चस्व होते. पण, 2 डिसेंबर 1993 रोजी मेक्सिकन पोलिसांनी एका चकमकीत पाब्लो एस्कोबारचा खात्मा केल्यानंतर मेक्सिकोतील पाब्लोचे एकहाती ड्रग्ज साम्राज्य लयाला गेले आणि तिथे नंतरच्या काळात ड्रग्ज तस्करांच्या अनेक टोळ्या उदयाला आल्या, यापैकीच एका टोळीचा एल मेंचो हा सदस्य होता. पण, नंतरच्या काळात एल मेंचोने या सगळ्या टोळीप्रमुखांचा खात्मा करून मेक्सिकोच्या ड्रग्ज साम्राज्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याला पकडण्यासाठी अमेरिका आणि मेक्सिको सरकारने तब्बल 136 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

27 जुलै 1966 रोजी मेक्सिकोतील मिचोआकान राज्यात एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात एल मेंचो याचा जन्म झाला. त्याचे मूळ नाव ‘रुबेन’ असे होते, शिवाय ‘नेमेसियो’ नावानेही तो ओळखला जात होता. मात्र, तो एल मेंचो या नावानेच जास्त ओळखला जात होता. एल मेंचोला एकूण पाच भाऊ होते- जुआन, मिगुएल, अँटोनियो, मारिन आणि अब्राहम. विशेष म्हणजे हे सगळेच्या सगळे भाऊ कमी अधिक प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचेच होते. मेंचोने तर अगदी लहान वयातच शेतात गांजा लागवड करायला सुरुवात केली होती. एका अर्थाने या बाळाचे पाय पाळण्यातच दिसून आले होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेंचोने बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करून तिथे वेगवेगळ्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. अमेरिकेत ड्रग्जचा फैलाव करण्यासही त्याने सुरुवात केली. त्यामुळे 1990 साली अमेरिकेने त्याला पकडून त्याची मेक्सिकोत रवानगी केली, त्यावळी त्याचे वय 30 वर्षे होते.

मेक्सिकोत आल्यानंतर त्याने मिलेनिया या ड्रग्ज तस्कर गँगबरोबर काम सुरू केले. याच दरम्यान मेक्सिकोतील अनभिषिक्त ड्रग्ज सम्राट पाब्लो एस्कोबार याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला आणि मेंचोच्या महत्त्वाकांक्षांना पंख फुटू लागले. त्याने ड्रग्ज तस्करीची स्वत:ची गँग उभा केली आणि आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने एक एक पायरी चढायला सुरुवात केली, काहीही करून आपण दुसरा पाब्लो एस्कोबार व्हायचेच हे त्याचे ध्येय होते. यासाठी सर्वात आधी त्याने अन्य ड्रग्ज तस्करी टोळ्यांच्या प्रमुखांचा एक एक करून घात करून त्यांच्या सहकार्‍यांना आपल्या पंखाखाली घेतले. जे या मार्गात आडवे येतील, त्यांना आणि शासकीय अधिकार्‍यांनाही त्याने यमसदनी धाडले. अशा प्रकारे तो शेवटी मेक्सिकोतील ड्रग्ज तस्करीचा बेताज बादशहा बनला.

मेक्सिकोतील ड्रग्जचे विश्व आपल्या कब्जात येताच मेंचोने काही शासकीय अधिकारी आणि पोलिसांना हाताशी धरून आपला ड्रग्जचा व्यापार मोठ्या प्रमाणात विस्तारला. अमेरिकेसह आजूबाजूच्या देशांमध्ये त्याने आपले ड्रग्ज तस्करीचे मजबूत जाळे विणले. मेंचो याने अनेक देशांमधील शासकीय आणि पोलिस यंत्रणेत आपले हेर पेरले होते. मेंचोकडून मिळणार्‍या पैशाच्या मोबदल्यात ही मंडळी मेंचोविरुद्ध सुरू असलेल्या प्रत्येक कारवाईची खडा न् खडा बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवत असायची. त्यामुळे पोलिसांनी जंग जंग पछाडले तरी मेंचो त्यांच्या हाताला लागू शकला नव्हता. एकदा तर त्याने त्याला पकडायला आलेल्या संपूर्ण मेक्सिकन सुरक्षा दलाचाच खात्मा केला होता. त्यामुळे मेक्सिको सरकारने त्याला मोस्ट वाँटेड गुन्हेगार ठरवून त्याला पकडण्यासाठी 100 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जवळपास 34 देशांमध्ये त्याचे ड्रग्ज तस्करीचे रॅकेट सक्रिय होते. या रॅकेटमध्ये 34 देशांमधील जवळपास 20 हजार सदस्य काम करीत होते. या माध्यमातून मेंचोने तब्बल 4 लाख 80 हजार कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केली होती.

19 मार्च 2015 रोजी जलिक्सोमधील ओकोटलान या शहरात मेंचो आल्याची खबर पोलिसांना लागली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता मेंचोचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांमध्ये तुफानी गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात पाच पोलिस, तीन नागरिक आणि मेचोचे तीन सुरक्षारक्षक ठार झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या मेंचोने आपल्या सुरक्षा रक्षकांना पोलिस सापडतील तिथे त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मेक्सिकोत सातत्याने मेंचोचे सुरक्षा रक्षक आणि पोलिसांमध्ये गोळीबाराच्या घटना सुरू झाल्या. परिणामी, अनेक पोलिस आणि पोलिस अधिकारी यामध्ये ठार झाले. लष्करी कारवाई करूनही मेंचो पोलिसांच्या हाती लागू शकला नव्हता, उलट अशा कारवायांमध्ये लष्करी अधिकार्‍यांचेही बळी पडत गेले. त्यानंतर मात्र मेक्सिको सरकारने हळूहळू मेंचोच्या मुसक्या आवळण्यासाठी कडक पावले उचलायला सुरुवात केली. पण, शासकीय आणि पोलिस यंत्रणेतील भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे प्रत्येकवेळी मेंचो पसार होण्यात यशस्वी होत होता. अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील संरक्षण कार्यालयाने अनेक वर्षांपासून एल मेंचोच्या कारवायांवर लक्ष ठेवले होते. अमेरिकेतील ड्रग्ज फैलावामागे मेंचोचाच हात असल्याची त्यांची खात्री होती, त्यामुळे अमेरिकाही मेंचोच्या मागावर होतीच. त्याच्या अटकेसाठी अमेरिकेने 30 कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. असा हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर 22 फेब्रुवारी 2026 रोजी जलिस्कोमधील तपालपा येथे मेक्सिको आणि अमेरिकन सुरक्षा दलांच्या कारवाई दरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडला आणि एका क्रूरकर्म्याचा अंत झाला. त्याच्या मृत्यूनंतर आठवडाभर त्याच्या समर्थकांनी मेक्सिकोमध्ये अक्षरश: तांडव घातले होते.

गुन्हेगार कुटुंब!

रोसालिंडा गोन्झालेझ व्हॅलेन्सिया ही एल मेंचोची पत्नी होती. त्यांना तीन मुले होती, जेसिका, लैशा आणि एल मेंचिटो. 2014 मध्ये अटक होण्यापूर्वी एल मेंचोचा मुलगा मेंचिटो हा आपल्या बापाच्या टोळीचा सेकंड-इन-कमांड होता. त्याला पोलिसांनी अनेकवेळा अटक केली होती; पण सबळ पुराव्याअभावी त्याला अनेक वेळा सोडण्यातही आले होते. त्यानंतर मेंचिटोचे 21 फेब्रुवारी 2020 रोजी अमेरिकेत प्रत्यार्पण करण्यात आले. सप्टेंबर 2024 मध्ये वॉशिंग्टन फेडरल कोर्टाने त्याला अनेक खून, अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी तुरुंगात डांबले आहे. तो आजही अमेरिकेच्या तुरुंगातच आहे. मे 2018 मध्ये एल मेंचोची पत्नी व्हॅलेन्सिया हिला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती; पण नंतर ती जामिनावर मुक्त झाली. परंतु, तिच्यावर अजूनही गुन्हेगारी आरोप आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये मेंचोची मुलगी जेसिका हिला वॉशिंग्टनमध्ये अटक करण्यात आली होती. तिला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

भारतात शिरण्याचा होता डाव!

एल मेंचो याचा भारतावरही डोळा होता. भारतात ड्रग्जची मोठी बाजारपेठ सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न होता. चार वर्षांपूर्वी काही माक्सिकन आणि नायजेरियन लोकांना हाताशी धरून त्याने ग्रेटर नोएडा आणि तामिळनाडूत ड्रग्जचे कारखाने सुरू केले होते; पण पोलिसांनी ते वेळीच उद्ध्वस्त करून टाकले. अन्यथा या माफियाने अख्ख्या भारताचा ‘उडता पंजाब’ करून सोडला असता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT