डॉ. गौरांगी वैद्य
मानसिक आरोग्याचे प्रश्न फक्त तरुणांपुरते मर्यादित नाहीत, तर वृद्ध व्यक्तींमध्येही हे दिवसेंदिवस वाढत आहेत. वय, जीवनशैलीतील बदल, शारीरिक आजार आणि सामाजिक एकाकीपणा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करतात.
ब्रिटिश जर्नल ऑफ जनरल प्रॅक्टिसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 55 वर्षांवरील सुमारे प्रत्येक पाचव्या व्यक्तीला मानसिक आरोग्याचा काही तरी प्रकारचा त्रास असतो. या अभ्यासानुसार डिप्रेशन, चिंता, स्मरणशक्तीतील किंवा विचारांतील समस्या, तसेच मद्यपानाशी संबंधित विकार आणि औषधांचा गैरवापर या समस्या अनेकदा वेळेवर ओळखल्या जात नाहीत किंवा उपचार होत नाहीत. वय, जीवनशैलीतील बदल, शारीरिक आजार आणि सामाजिक एकाकीपणा मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करतात. या लक्षणांची लवकर ओळख होण्याने वृद्ध व्यक्तींना भावनिक संतुलन राखण्यास तसेच एकूण आरोग्य टिकवण्यास मदत करू शकते.
या अभ्यासानुसार सर्वात सामान्य आढळणारे आजार म्हणजे डिप्रेशन, चिंता किंवा पॅनिक डिसऑर्डर, स्मरणशक्ती किंवा विचारांशी संबंधित संज्ञानात्मक आजार आणि औषध किंवा इतर पदार्थांचा गैरवापर. या अभ्यासानुसार, वृद्धापकाळात स्त्रियांमध्ये डिप्रेशन आणि चिंता जास्त आढळते. मधुमेह, हृदयविकार किंवा दीर्घकालीन वेदना यांसारख्या आजारांमुळे मूड बिघडण्याची किंवा चिंता वाढण्याची शक्यता असते. जीवनातील जोडीदार, मित्र किंवा स्वातंत्र्य गमावणे या गोष्टी दुःख किंवा एकाकीपण निर्माण करू शकतात. औषधांचे दुष्परिणाम किंवा झोपेच्या समस्यांमुळे मनःस्थिती ढासळते. विशेषतः गावांमध्ये किंवा एकटे राहणार्या वृद्ध व्यक्तींमध्ये सामान्य आहे. तसेच मेंदूतील वृद्धत्वाशी संबंधित बदल किंवा डिमेंशियामुळे थेट डिप्रेशन, उदासीनता किंवा चिंताग्रस्तता निर्माण होऊ शकते. बहुतांश वृद्ध व्यक्ती चिंता किंवा अस्वस्थता याबद्दल डॉक्टरांशी बोलायला संकोच करतात. क्लिनिकमध्ये वेळेची कमतरता आणि प्रशिक्षित कर्मचार्यांची मर्यादा असल्याने त्यांचे निदान कठीण ठरते; पण मानसिक आजार ओळखला गेला नाही, तर शारीरिक आजार गंभीर होऊ शकतो आणि जीवनमान घटते.
स्थानिक आरोग्यसेवा प्रदात्यांचा वृद्ध व्यक्तींच्या मानसिक आरोग्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांचा मूड, झोपेचे प्रमाण व गुणवत्ता, सामाजिक आयुष्य आणि आयुष्यातील धक्कादायक बाबी याबाबत चौकशी करणे, लहान प्रश्नावलीद्वारे डिप्रेशन किंवा चिंता तपासणे, औषधांवर लक्ष ठेवणे, सामाजिक संपर्क, सौम्य व्यायाम आणि समुदायात सहभाग यासाठी प्रोत्साहन देणे, तसेच आवश्यक असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी समन्वय करणे या गोष्टी वृद्ध व्यक्तींवर उपचार करणार्यांनी लक्षात घ्यायला हव्यात. हलका व्यायाम, पोषणतत्त्वांनी समृद्ध आहार, सामाजिक संबंध, वाचन, कोडी सोडवणे, सर्जनशील छंद जोपासणे यामुळे मेंदू सक्रिय राहतो. या सवयी एकत्र केल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.