जळगाव : जळगाव तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना गुरुवारी (दि.1) समोर आली आहे. दरम्यान ही जीवनयात्रा संपवल्याची घटना नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26 रा. किनोद ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
गायत्री कोळी ही विवाहिता जळगाव तालुक्यातील किनोद गावात पती, सासू आणि दोन मुलं यांच्यासह वास्तव्याला होती. पती भाजीपाला विक्री करतात तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम काम करत होत्या.
गुरुवारी (दि.1) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने जीवनयात्रा संपवली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे. मयत विवाहिता गायत्रीचा भाऊ सागर कोळी यांनी सांगितले की, "गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता. दरम्यान हा वाद विकोपाला गेला. तिने हा प्रकार वडिलांना देखील सांगितला होता. पण वडील बाहेरगावी गेले होते. असे असताना तिच्या सासू आणि नणंद यांनी घरी येऊन तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर जीवनयात्रा संपवल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला गळफास देत लटकवून दिले" असा आरोप केला आहे.
दरम्यान गायत्रीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिचे पती, सासू आणि नणंद हे फरार झाले. गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. ही जीवनयात्रा संपवल्याची घटना नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. गायत्रीच्या पश्चात तिचे पती, मुलगा ध्रुव (वय 5), मुलगी नियती (वय 7) असा परिवार आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.