नाशिक : शहरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असली तरी, या रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी आणखी एका एमडी विक्री करणाऱ्या संशयितास बेड्या ठोकल्या आहेत.
इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत एमडी विक्री करणाऱ्याची माहिती मिळाली. त्यानुसार टाकलेल्या छाप्यात संशयित खालीद कय्युम शाह (२९, रा. बिल्डींग अे १०, रूम न. ५१, म्हाडा वसाहत, वडाळागाव) याच्याकडे २५ हजार ५०० रुपये किंमतीचे ५.५ ग्रॅम एमडी नावाचा अंमली पदार्थ आढळून आला. आर्थिक फायद्याकरीता त्याने बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने एमडी जवळ बाळगल्याचे पोलिस तपासात समोर आले. दरम्यान, संशयिताविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंकोलीकर तपास करीत आहेत.