Thane Manjunath Shetty | कॅसिनो बाबा! ‘बॉम्बे टू गोवा’ : एका भोंदूच्या ‘अगाध लीला’ 
क्राईम डायरी

Thane Manjunath Shetty | कॅसिनो बाबा! ‘बॉम्बे टू गोवा’ : एका भोंदूच्या ‘अगाध लीला’

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

गेल्या आठ-दहा वर्षांपासून ठाणे परिसरात मंजुनाथ शेट्टी या भोंदूबुवाने आपले भोंदूगिरीचे दुकान ठाकले होते. या परिसरात तो दीक्षित बाबा म्हणून ओळखला जात होता. मंत्रतंत्र, जादूटोणा, काळी जादू, ही म्हणे या बाबाची खासियत होती. आपल्या दरबारात येणार्‍या सगळ्या भक्तांच्या केवळ समस्याच नाही, तर तो कधी मरणार आहे, याचेही हा भामटा भाकीत करायचा. आता साक्षात मृत्यूच समोर ठाकल्यावर कुणीही सर्वसाधारण माणूस लटपटणारच! हा भोंदू नेमका याचा गैरफायदा घ्यायचा आणि त्या भक्ताच्या डोक्यावरील मृत्यूची छाया दूर करण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचा. याशिवाय घरातील भांडणतंटे, बरकत, नोकरी, साधन-संपत्ती, मूलबाळ, करणी काढणे यासाठी हा भामटा लोकांकडून लाखो रुपये उकळायचा. वर्षानुवर्षे अगदी बिनबोभाटपणे त्याचा हा गोरखधंदा सुरू होता.

आता मुळात हा एक नंबरचा भामटा, त्यात त्याच्या हातात विनासायास लाखो रुपये पडू लागल्यावर त्याला अवदसा आठवली नसती तर नवलच! झालंही तसंच, या भोंदूबुवाला गोव्यात जाऊन अय्याशी करण्याची आणि कॅसिनोमध्ये बसून लाखो रुपये उधळण्याची चटक लागली. पाच-दहा लाख रुपये हातात पडले की, हा भामटा कधी विमानाने तर कधी समुद्रमार्गे थेट गोवा गाठायचा आणि तिथे येणार्‍या परदेशस्थ तरुणी आणि महिलांसोबत अय्याशी करायचा. माया हातात पडताच त्याचा गोव्याचा मोह व्हायचा आणि हा पठ्ठ्या थेट गोव्याची वाट धरायचा, तिथे जाऊन मांस, मदिरा आणि मदिराक्षींच्या समुद्रात तुडूंब डुबक्या मारायचा, कॅसिनोत जुगार खेळायचा, त्यावरूनच त्याचे नाव कॅसिनो बाबा असे पडले आहे. ठाणे पोलिसांनी या बाबाच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याचे एक-एक कारनामे आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.

ठाणे गुन्हे शाखेने या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. याने मुंबई, ठाण्यात आणि राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय. तुमच्यावर कोणी तरी काळी जादू केलीये. अघोरी पूजा करून तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देतो, तुम्हाला मुलं-बाळ होईल यासाठी पूजा करतो. याची भूरळ पाडून दीक्षित बाबाने ठाणे आणि मुंबईत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. हा दीक्षित बाबा लोकांना सहज शिकार बनवायचा. हा बाबा अघोरी पूजा आणि काळी जादू करता पीडितांकडून पैसे घ्यायचा आणि ती काळी जादू-अघोरी पूजा करण्यासाठी गोव्याला जायचा. हा कसिनो बाबा थाटात महागड्या विमान तिकिटावर प्रवास करून गोव्यातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होता. कसिनोमध्ये याचा थाट एखाद्या लक्ष्मी पुत्राला लाजवेल असा होता.

पोलिसांच्या तपास यंत्रणांना असेही आढळून आले आहे की, हा भोंदूबाबा गोळा केलेला पैसा धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यासाठी वापरत नव्हता, तर जुगार आणि चैनीसाठी वापरत होता. अशी माहितीदेखील समोर येत आहे की, सर्व पैसे संपल्यानंतर हा बाबा परत नवी शिकार शोधायचा. बाबाचं पितळ जेव्हा उघडकीला आले, तेव्हा पोलिसांना त्याच्या कृत्यांबद्दल माहिती मिळाली. ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत त्याला गोव्यातील एका कॅसिनोमधून अटक केली. अटकेनंतर आरोपीची चौकशी सुरू असून, त्यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. बाबाच्या या कारनाम्यांमध्ये काही बड्या हस्तींचा वरदहस्त आहे काय, त्या द़ृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी दीक्षित बाबाला अटक करून त्याच्या बँक खात्यांची तपासणी सुरू केली आहे. अनेक पीडितांनी त्याला लाखो-कोट्यवधी रुपये दिल्याचे समोर आले आहे. या पैशांचा नेमका वापर कुठे झाला, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, आणखी किती लोक या फसवणुकीचे बळी ठरले आहेत, याचाही तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकण्याचा धोका अधोरेखित झाला आहे.

या कॅसिनो बाबाच्या कारनाम्यात गोव्यातील काही कॅसिनो चालक आणि कॅसिनोतील कर्मचारीही सामील असल्याचे समोर येत आहे. अनेकवेळा हे कॅसिनोतील कर्मचारीच या भोंदूबाबाला ग्राहक शोधून देत होते. हा बाबा महाप्रतापी आहे, त्याचे दैवी सामर्थ्य अफाट आहे, असे सांगून ही मंडळी कॅसिनोत येणार्‍या धनदांडग्यांना या बुवाच्या कच्छपी लागायला भाग पाडत होती. सध्या या दलालांचीही चौकशी सुरू आहे, त्यातूनही अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. कदाचित या बाबाला मिळणार्‍या लाखो रुपयांच्या मलिद्यामध्ये या लोकांचीही टक्केवारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे या लोकांनी संगनमताने गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या काही परदेशस्थ नागरिकांना आणि विशेषत: महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घातला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कॅसिनो बाबाचे कारनामे विचारात घेता त्याने प्रामुख्याने परदेशस्थ महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या भोंदूबाबाची पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे.

एका रात्रीचे बिल चौदा लाख रुपये!

या कॅसिनो बाबाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याला गोव्यातील विविध कॅसिनोमध्ये फिरवले. त्यावेळी त्याचे एकापेक्षा एक कारनामे ऐकून पोलिसही चाट पडले. या बाबाचा मुक्काम हा प्रामुख्याने तारांकित हॉटेल्समध्ये असायचा. दोन-दोन, चार-चार दिवस तेथे त्याच्या रासलीला चालायच्या. एका हॉटेलमध्ये या बाबाच्या एका रात्रीच्या मुक्कामाचे बिल तब्बल चौदा लाख रुपये झाले असल्याची बाब तपासात पुढे आली आहे. यावरून हा बाबा त्या ठिकाणी कोणत्या हाय लेव्हलची अय्याशी करीत असावा त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT