अशोक मोराळे
पुणे: अभयच्या छातीतील गोळीची जखम, जमिनीवरील रक्ताचे दोन ठिकाणी थारोळे आणि भिंतीवर उडालेले रक्त... पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. तपासाची चक्रे फिरली, त्यात शवविच्छेदन अहवालाने संशयाला बळ दिले आणि कोट्यवधींच्या मालमत्तेच्या वादातून आजोबानेच नातवावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खुनानंतर पुरावे पुसण्याचा घरच्यांचा प्रयत्न झाला; पण अखेर पोलिसांनी अपघाताच्या बनावामागचे सत्य बाहेर काढलेच.
लोणावळ्यातील भुशी परिसरातील मराठे कुटुंबीय सधन होते. हॉटेलचा व्यवसाय, कोट्यवधींची मालमत्ता आणि कुटुंबाचा मोठा पसारा. या कुटुंबाचे प्रमुख मोतीराम मराठे वयाच्या ८३ व्या वर्षीही मालमत्तेचे केंद्रबिंदू होते. त्यांच्या नावावर सुमारे १५ एकर जमीन होती. शिकारीचा नाद असल्याने त्यांच्याकडे बारा बोअर रायफलसह परवाने होते. मात्र, याच मालमत्तेच्या वादाने कुटुंबातील नात्यांमध्ये विष कालवले होते. मोतीराम आणि त्यांचा नातू अभय माणिक मराठे (वय ३३) यांच्यातून विस्तवही जात नव्हता.
सोमवार, ५ तारखेची सकाळ, घड्याळात अकरा वाजले आणि लोणावळा शहर पोलिस ठाण्यात फोन खणखणला. ‘हॉटेल मोतीराममध्ये रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली आणि अभयचा मृत्यू झाल्याची’ माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांनी सांगितलेली कहाणी साधी, सरळ होती. या कहाणीतील प्रत्येक तपशील जणू आधीच ठरवून ठेवलेला असल्यासारखा वाटत होता. त्यामुळे कदाचित लोणावळा शहर पोलिसांना याचे गांभीर्य लक्षात आले नसावे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि त्यांच्या पथकाला तपासासाठी पाठवले. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हॉटेलच्या हॉलची पाहणी सुरू केली. काऊंटरजवळच्या भिंतीच्या डाव्या बाजूला रक्ताचे थारोळे होते. त्यापासून सुमारे तीन फूट अंतरावर रक्ताचे दुसरे थारोळे दिसत होते. दरवाजाजवळच्या भिंतीवरही रक्ताचे डाग पडलेले होते. रायफल एका कोपऱ्यात पडलेली, तर टेबलावर रायफल साफ करण्याचे साहित्य आणि दोन काडतुसे एक जिवंत, दुसरे वापरलेले आढळले. घटनास्थळावरील हे चित्र अपघाताच्या कथेशी तंतोतंत जुळत नव्हते. रक्ताचे दोन थारोळे कशाचे संकेत देत होते? पोलिसांच्या मनात एव्हाना प्रश्नांची मालिका सुरू झाली होती.
तेवढ्यात शवविच्छेदन अहवालातील निरीक्षणांनी संशय अधिकच गडद केला होता. अभयला गोळी चुकून लागल्याच्या कथेशी जखमेचे स्वरूप जुळत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रायफलची लांबी सुमारे चार फूट दोन इंच होती. ती साफ करताना नळी स्वतःकडे ठेवून ट्रिगरपर्यंत हात पोहोचविण्याची शक्यता तपासताना पोलिसांना कुटुंबीयांच्या कथनाबाबत आणखी शंका निर्माण झाली.
आता पोलिसांनी कुटुंबीयांसह हॉटेलमधील कामगारांची चौकशी सुरू केली. मात्र, सुरुवातीला कोणीही तोंड उघडायला तयार नव्हते. कुटुंबीयांच्या जबाबांत विसंगती होती; पण अपघाताचा बनाव कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर पोलिसांच्या हाती कामगार अनिकेत घुस्सर याची माहिती लागली आणि घटनाक्रमाला नवे वळण मिळाले.
अनिकेतने सांगितले की, तो सकाळी नऊच्या सुमारास याठिकाणी कामावर आला होता. हॉटेलमध्ये मनोज मराठे आले होते. त्यानंतर हिरामण मराठेही दाखल झाले. सकाळी अकराच्या सुमारास अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला. अनिकेत धावत हॉलमध्ये गेला, तेव्हा एक व्यक्ती खाली पडलेली दिसली. हिरामण, त्यांची पत्नी आणि बहीण त्या व्यक्तीला उचलत होते. जवळ गेल्यावर ती व्यक्ती अभय असल्याचे त्याला समजले. तेवढ्यात मनोज मराठे तेथे आले. त्यांनी वडील हिरामण यांच्यासमोरच मोतीराम यांना उद्देशून, 'बाबा, तुम्ही हे माझ्या भावाला काय केले?' असा जाब विचारल्याचे अनिकेतने सांगितले.
या एका वाक्याने पोलिसांच्या तपासाला निर्णायक दिशा मिळाली. गोळीबारानंतर हॉटेलचे गेट बंद करण्यात आले. अभयला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचा जीव वाचला नाही. त्यानंतर हिरामण याने अनिकेतला बोलावून घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगू नको, अशी धमकी दिली. हॉटेलमधील सीसीटीव्ही गायब करण्यात आले होते. म्हणजेच, गोळी झाडल्यानंतर केवळ अपघाताची कहाणी सांगण्यात आली नव्हती, तर प्रत्यक्षदर्शीला गप्प करण्याचा आणि महत्त्वाचा पुरावा हटविण्याचाही प्रयत्न झाला होता.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशीचा फास आवळला. तपासात अभय आणि त्याचा आजोबा मोतीराम यांच्याशी मालमत्तेवरून वाद असल्याचे स्पष्ट झाले. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि तो एवढा विकोपाला गेला की, मोतीराम याने रायफलमधून अभयवर गोळी झाडली. गोळी लागून अभय खाली कोसळला आणि काही क्षणांतच तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
मोतीराम याच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या जमिनीचा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. मोतीराम याला काही झाले, तर मालमत्तेचे हस्तांतरण आणि वारसाहक्काचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, या विचारातून खुनावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला. अभयचा खून झाला असतानाही कुुटुंबातील काही सदस्यांनी संगनमताने घटना लपविण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या प्रकरणी मोतीराम मराठे यांच्यासह हिरामण मराठे, मनोज मराठे, कविता मराठे आणि राजश्री पवार अशा पाच जणांना अटक करण्यात आली. घटनास्थळावरील रक्ताचे डाग, जखमेचे स्वरूप, कामगाराचा जबाब आणि गायब झालेले सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या धाग्यांनी अपघाताच्या बनावाचा पडदा बाजूला गेला होता.