Online Loan Scam  File Photo
क्राईम डायरी

Online Loan Scam | ‘लोन’चं लोणकढी ‘लोणी’! लिंकवर क्लिक केलं अन् बँक खात झालं रिकामं

ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा

पुढारी वृत्तसेवा
आशिष शिंदे, कोल्हापूर

Online Loan Scam

एका मध्यमवर्गीय कॉलनीत राहणारा आदित्य गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. व्यवसाय डगमगत चालल्याने कर्जाचे ओझे वाढत होते. अशात एके दिवशी फेसबुकवर स्क्रोल करताना त्याला लो क्रेडिट स्कोअर? तरीही मिळवा कर्ज, तेही अगदी कमी व्याजदरात! अशी एक जाहिरात दिसली. त्याने जाहिरातीतील लिंकवर क्लिक केले आणि एक फॉर्म भरून टाकला. नाव, मोबाईल नंबर, आधार-पॅन, बँक डिटेल्स सगळं त्याने त्या वेबसाईटवर भरलं.

दुसर्‍याच दिवशी फायनान्समधून फोन आला. सर, तुमचं 3 लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. फक्त 2,499 रुपयांची प्रोसेसिंग फी भरावी लागेल. ती भरल्यानंतर लोन प्रोसेसिंग ओटीपी येईल, तो मला सांगा, ओटीपी सांगा म्हटल्यानंतर आदित्यच्या डोक्यात क्षणासाठी विचार आला, ओटीपी कशासाठी? पण आर्थिक अडचणीमुळे आदित्यने चटकन ऑनलाईन 2,499 रुपये पाठवले आणि ओटीपी सांगितला. मग काय, प्रोसेसिंग फीही गेली आणि बँक खातंही रिकामं झालं.

सध्या ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेक अ‍ॅप्स व फेक साईटस् बनवून सायबर चोरटे अनेकांना गंडा घालत आहेत. आजकाल प्रत्येकाच्या फोनवर, सोशल मीडिया फीडमध्ये कर्ज हवे आहे का, असा मेसेज, फोन आणि पोस्टचा भडिमार सुरू आहे. याच लोनच्या सापळ्याची माहिती देण्यासाठी वरील पात्राचा आधार घेण्यात आला आहे. सध्या अशा प्रकारे अनेकांना सायबर चोरट्यांनी अक्षरशः लुटले आहे. कर्ज देतो, क्रेडिट कार्ड देतो, क्रेडिट कार्डवर कर्ज देतो, कमी व्याजदरात कर्ज देतो, कोणतीही प्रोसेसिंग फी नाही, सगळं ऑनलाईन प्रोसिजर आहे, कोणतीही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, असे सांगून फेक साईट बनवून अनेकांना गंडा घातला जात आहे.

फेक लोन ऑफर्स देऊन तुमच्याकडून प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फी यासाठी पैसे घेतले जातात; पण कर्ज काही मिळत नाही. फिशिंग वेबसाईटस् आणि लिंक्स बनवून एखाद्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटसारखीच हुबेहूब साईट बनवली जाते. यानंतर तुमचे आधार, पॅन, बँक डिटेल्स घेतले जातात आणि त्या माहितीचा वापर करून एक तर तुमचे बँक खाते खाली केले जाते, नाहीतर तुमच्याच नावाने कर्ज घेऊन सायबर चोरटे फरार होतात.

ऑनलाईन लोनच्या सापळ्यात अडकायचे नसेल, तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा :

फक्त अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच लोनसाठी अर्ज करा. अनोळखी लिंकवरून अर्ज करू नका. कोणी प्रोसेसिंग फी मागितली, तर थांबा कारण प्रत्यक्ष लोन मिळाल्याशिवाय कोणीही पैसे मागत नाही. आधार, पॅन, ओटीपी कुणालाही देऊ नका.तुमचं लोन मंजूर झालं आहे, लिंकवर क्लिक करा अशा ईमेल्सना, मेसेजेसमधील लिंकवर क्लिक करू नका. या ऑनलाईन फेक लोनचा सापळा नेहमी ‘लवकर, कमी कागदपत्रांमध्ये आणि कमी व्याजदरात’ सुरू होतो. पण, शेवटी तो तुमचं बँक खातं रिकामं करून जातो. त्यामुळे अशा ऑनलाईन कर्जाच्या भानगडीत पडताना एकदा नक्की विचार करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT