प्रेमापायी सर्व काही गमावलेला वकील: सावकारीचा व्यवसाय आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश  Pudhari File Photo
क्राईम डायरी

Love Affair Gone Wrong | प्रेमापायी सर्व काही गमावलेला वकील: सावकारीचा व्यवसाय आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश

वकिली अन् सावकारीतून करोडो कमावणाऱ्या युवकाचा नवा अंध प्रवास; गर्भवती पत्नीचा क्रूर अंत

पुढारी वृत्तसेवा

वकील बनून तो कायदा शिकला... पर्यायी व्यवसाय म्हणून सावकारी करत भरमसाट व्याजातून लाखो रुपयेही कमावले. पैसा आला तसा लव्ह करून मॅरेज केलेली पत्नी नकोशी वाटू लागली. दुसरी वकील बाई भेटली. तिच्या प्रेमात पडला. जिच्या पोटात आपला सात महिन्याचा अंश वाढतोय, त्या गर्भवती पत्नीला ठार केलं. चाकरीसाठी गाव सोडलेल्या बापाच्या या मुलानं वकिली अन् सावकारीतून भरपूर कमावलं. पण, एका बाईच्या नादानं सारंच गमावलं...!

संजय सूर्यवंशी, बेळगाव

आजही नेहमी चर्चा सुरू असते की, लव्ह मॅरेज चांगले की अ‍ॅरेंज मॅरेज... प्रेम होऊन झालेलं लग्न अर्थात लव्हमॅरेज करणारी जोडपी लग्नाआधी एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत, अशी स्थिती असते. परंतु, एकदा का लग्न झाले की कुरबुरी, भांडणे अन् एकमेकांना तुच्छ लेखणं सुरू होतं. न्यायालयात आजकाल घटस्फोटासाठी येणार्‍या घटनांमध्ये लव्ह मॅरेजच्या जोडप्यांची संख्या देखील वाढते आहे, ही शोकांतिका आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील उगार बुद्रुक येथे वकिलाने स्वतःच्या पत्नीचा सापळा रचून खून केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या वकिलाने आपल्याच गल्लीतील तरुणीशी प्रेमविवाह केला होता. परंतु, अवघ्या तीन वर्षांतच त्याला पत्नी नकोशी वाटू लागली अन् त्याने खुनाचे नियोजन केले.

प्रदीप किरणगी हा तरुण पेशाने वकील. सध्या त्याची वकिलीही जोरात सुरू होती. तो स्वतः 100 ते 120 प्रकरणात वकील होता. काही वर्षांपूर्वी त्याचे आजोबा विजापूर जिल्ह्यातून चाकरीसाठी उगारला येऊन राहिले आणि किरणगी कुटुंब उगारचे झाले. वडीलही चाकरी अन् शेतकाम करायचे. परंतु, त्यांचा पोरगा प्रदीप शिकला आणि वकील बनला. वकिलीमध्ये बर्‍यापैकी पैसा येऊ लागल्यानंतर तो पठाणी व्याजाने फिरवायचे काम देखील करत असल्याची आता चर्चा आहे. पोलिस याबाबत उघडपणे सांगत नसले तरी यामध्ये तथ्य निश्चितच दिसून येते. कारण वकिलीमध्ये असलेल्या प्रदीपने कायद्याचा धाक दाखवत भरमसाट व्याज वसूल करत आपला चांगलाच जम बसवला होता. मूळ मुद्दल व व्याज न देणार्‍या अनेकांची वाहने त्याने ओढून आणून लावल्याचेही समोर आले आहे.

याच वकिलाचे त्याच्या गल्लीतच राहणार्‍या चैतालीवर प्रेम जडले. मुलीच्या घरच्यांचा विरोध असतानाही त्यांनी लग्न केले. परंतु लग्नानंतर चैतालीला सासूरवास सुरू झाला. सासरच्या लोकांसह नवर्‍याचाही त्रास सुरू झाला अन् तिचे ग्रह फिरले. चैतालीचे हे ग्रह इतके फिरले की, तिचा हकनाक बळी गेला.

वकील बाईच्या प्रेमात हाती चांगला पैसा खेळू लागलेल्या प्रदीपची चैन वाढली. वकिली करताना येथेच कंत्राट पद्धतीने वकिली शिकणार्‍या एका तरुणीच्या तो प्रेमात पडला. इकडे दोघांचा संपर्क वाढला अन् याच काळात चैतालीने प्रदीपला ‘गोड बातमी’ दिली. बाप होणार याच्या आनंदाऐवजी प्रदीपच्या काळजात धस्स् झाले. कारण दुसर्‍या महिलेच्या प्रेमात अकंठ बुडालेल्या प्रदीपला आता प्रेमात चैताली अडचण वाटत असताना पुन्हा बाळ झाले तर आणखी अडचण वाढणार, ही बाब सतावू लागली. त्यामुळे त्याने चैतालीला संपवण्याचा कट रचला.

चैतालीचा अपघाती खून करायचा व तो अपघात भासवायचा, असा कट प्रदीपने रचला. 9 सप्टेंबर रोजी प्रदीपने चैतालीचा अपघाती खून केला.

त्याच्या पंधरा दिवस आधीही त्याने तसाच प्रयत्न केला होता. एका मित्राला त्याने सांगितले होते की आम्ही दोघे रस्त्याने चालत जातो, तिला रस्त्यावरून नेतो तू पाठीमागून येऊन जोराची धडक मार. तसे नियोजन केले खरे, परंतु, दोघे रस्त्यावरून जाताना त्या मित्राला वाहन धडकवण्याचे धाडस झाले नाही म्हणून नियोजन फसले. ज्या दिवशी खून घडला त्या दिवशीही सकाळी तिला घराबाहेर फिरून ये, असे सांगून स्वतःच कार चालवून अंगावर घालायची, असाही प्रयत्न केला. परंतु, रस्त्यावर लोक असणार या भितीने त्याला ते देखील धाडस झाले नाही. परंतु, याच दिवशी सायंकाळी त्याने उगारपासून तीन किलोमीटरवर तिला दुचाकीवरून नेले. दोघा मित्रांना कार घेऊन यायला सांगून त्यानंतर तिला रस्त्यावर थांबवून कार धडकवली व गंभीर जखमी करत तिला ठार केले.

सर्वकाही सिनेमा स्टाईल

सर्वकाही पूर्वनियोजनानुसार प्रदीपने काम फत्ते केले. अपघातानंतर लगेचच कागवाड पोलीस ठाण्याला फोन करून पत्नीला कारने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे, तिला कागवाडला हॉस्पीटलला नेत आहे, असे सांगितले. पोलीस जेव्हा हॉस्पीटलला पोहोचले तेव्हा ती खूपच गंभीर असल्याने सांगली जिल्ह्यातील मिरजेला नेल्याचे सांगत तिकडे नेले व थोड्या वेळाने पत्नीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. हे सर्व सांगताना तो उत्तरीय तपासणी करा, मृतदेह ताब्यात द्या, हे वारंवार पोलिसांना सांगत होता. यासाठी तो इतकी घाई करत होता की पोलिसांना त्याचाच संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला अन् हे प्रकरण उघडकीस आले. आज या वकीलासह पाच जणांना अटक केली आहे. पैसा, मानमरातब सर्वकाही मिळाले तरी ते व्यवस्थित पचवता न आल्याने एका बाईच्या नादानं अ‍ॅड. प्रदीपचे आयुष्य मात्र अंधःकारमय बनवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT